मिरज-कुपवाडमध्ये मोकाट कुत्र्यांचा कहर!
मिरज-कुपवाडमध्ये मोकाट कुत्र्यांचा कहर!
बसस्थानकाजवळ चिमुकल्याच्या हाताचा लचका; महापालिकेच्या निष्क्रियतेवर नागरिक संतप्त.
सांगली, मिरज आणि कुपवाड शहरात मोकाट कुत्र्यांचा वाढता उपद्रव आता गंभीर स्वरूप धारण करत असून, लहान मुलांवरील हल्ल्यांच्या वाढत्या घटनांमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील अनेक भागांत मोकाट कुत्र्यांचे कळप मुक्तपणे फिरत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
या पार्श्वभूमीवर कुपवाड बसस्थानक परिसरात घडलेली घटना संतापजनक ठरली आहे. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या कार्यालयालगतच एका मोकाट कुत्र्याने निष्पाप चिमुकल्यावर हल्ला करून त्याच्या हाताचा लचका तोडला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. जखमी बालकाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर अँटी-रेबीज लस आणि आवश्यक उपचार करण्यात आले.
शहरातील शाळांजवळ, वसाहतींमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. शाळेत जाणारी मुले, रस्त्यावर खेळणारी बालके आणि ज्येष्ठ नागरिक हे सतत धोक्याच्या छायेत वावरत आहेत. त्यामुळे अनेक पालक आपल्या मुलांना एकट्याने बाहेर पाठवण्यासही धजावत नसल्याचे चित्र आहे.
नागरिकांच्या मते, सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेकडे वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नाही. कुत्र्यांना पकडण्यासाठी असलेली डॉग व्हॅन केवळ कागदोपत्री असल्याचा आरोप नागरिकांनी केला असून, प्रत्यक्षात कोणतीही प्रभावी मोहीम राबविली जात नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, शहरातील विविध भागांत मोकाट गाढवे आणि घोड्यांचाही उपद्रव वाढला असून, हे प्राणी रस्त्यांवर मुक्तपणे फिरत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे अपघाताचा धोका वाढून नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे.
मोकाट कुत्रे, गाढवे आणि घोड्यांच्या वाढत्या उपद्रवावर तातडीने नियंत्रण मिळवून नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.


No comments: