साताऱ्यात डॉल्बीचा दणदणाट महागात; 15 गुन्हे दाखल
साताऱ्यात डॉल्बीचा दणदणाट महागात; 15 गुन्हे दाखल.
--------------------------------
सातारा प्रतिनिधी
अमर इंदलकर
--------------------------------
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर पोलिसांची कारवाई; 2 कोटी 25 लाखांचा मुद्देमाल जप्त.
– मा. मुंबई उच्च न्यायालय आणि राज्य शासनाने निर्धारित केलेल्या नियमांचे उल्लंघन करून सार्वजनिक ठिकाणी उपद्रव होईल अशा पद्धतीने डॉल्बीचा वापर करणाऱ्यांसह सार्वजनिक रस्त्यावर पादचारी व वाहनधारकांच्या ये-जा करण्यास अटकाव करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध सातारा पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. शाहुपूरी पोलीस ठाणे हद्दीत 12, तर सातारा शहर पोलीस ठाणे हद्दीत 3 अशा एकूण 15 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. या कारवाईत डॉल्बी साउंड सिस्टीमसह वाहने असा सुमारे 2 कोटी 25 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक निखील पिंगळे व अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी गणेशोत्सव काळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हा पोलीस दलाला दिल्या होत्या. त्यानुसार गणेश मंडळे व डॉल्बी मालकांना भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 मधील कलम 168 अन्वये प्रतिबंधात्मक नोटिसा देण्यात आल्या होत्या.
24 सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान शाहुपूरी व सातारा शहर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कारवाई करण्यात आली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, संबंधितांनी निर्धारित नियमांचे उल्लंघन करून डॉल्बीचा वापर केला तसेच काही ठिकाणी सार्वजनिक रस्त्यावरील वाहतूक व पादचाऱ्यांच्या ये-जा करण्यास अडथळा निर्माण केला.
या कारवाईत शाहुपूरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 12 गणेश मंडळांशी संबंधित व्यक्तींवर, तर सातारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 3 गणेश मंडळांशी संबंधित व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कारवाईमध्ये डॉल्बी साउंड सिस्टीम, ट्रॅक्टर, ट्रक, टेम्पो आदी वाहने जप्त करण्यात आली आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निखील पिंगळे व अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे, सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश तांबे, शाहुपूरी पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक प्रियांका बाबर तसेच संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली.
शाहुपूरी पोलीस ठाणे हद्दीत कारवाई झालेली मंडळे :
जय शिवराय मित्र मंडळ, नवरत्न गणेशोत्सव मंडळ, अष्टविनायक गणेश मंडळ, शाहुपूरी गणेश मंडळ, विठ्ठल नगरचा विघ्नहर्ता गणेश मंडळ, श्रियश गणेशोत्सव मंडळ, सुयोग गणेशोत्सव मंडळ, एकता गणेशोत्सव मंडळ, बालस्मृती गणेश मंडळ, संघर्ष मित्रमंडळ, शिवनगर गणेशोत्सव मंडळ आणि शिवतेज गणेशोत्सव मंडळ.
सातारा शहर पोलीस ठाणे हद्दीत कारवाई झालेली मंडळे :
बाल गणेश तरुण मंडळ, अजिंक्यतारा गणेशोत्सव मंडळ आणि भोसलेनगर गणेशोत्सव मंडळ.
पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे गणेश विसर्जन मिरवणुकीतील ध्वनिप्रदूषण, सार्वजनिक रस्त्यावरील अडथळे आणि नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

No comments: