रखडलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाला अखेर गती; ई-टेंडर प्रक्रिया सुरू.
रखडलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाला अखेर गती; ई-टेंडर प्रक्रिया सुरू.
फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र | सिद्धार्थ कदम, पुसद.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
पुसद: प्रभाग क्रमांक ११ मधील संभाजीनगर येथे अनेक दिवसांपासून रखडलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या कामाला अखेर गती मिळाली आहे. नगराध्यक्ष ॲड. मोहिनीताई इंद्रनील नाईक यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री इंद्रनील भाऊ नाईक यांचे सहकार्य लाभल्याने या कामासाठी आवश्यक निधी मंजूर झाला आहे.
निधी मंजूर होताच नगरपालिकेने कामाच्या पुढील प्रक्रियेला वेग दिला असून ई-टेंडर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
संभाजीनगर परिसरातील नागरिकांसाठी हे सांस्कृतिक भवन सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि विविध सार्वजनिक उपक्रमांचे महत्त्वाचे केंद्र ठरणार आहे. त्यामुळे रखडलेले काम मार्गी लागल्याने परिसरात समाधान आणि आनंदाचे वातावरण आहे.
या कामासाठी सातत्याने प्रयत्न करून निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते रंगनाथ धिरे, जागो भीमसैनिक मित्र मंडळ, रमाई महिला मंडळ तसेच तालुक्यातील सकल बौद्ध समाजाने राज्यमंत्री इंद्रनील भाऊ नाईक आणि नगराध्यक्ष मोहिनीताई नाईक यांचे आभार मानले.
परिसरातील नागरिकांची अपेक्षा: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रेरणा देणारे हे सांस्कृतिक भवन आता लवकरात लवकर पूर्ण होऊन नागरिकांच्या सेवेत दाखल व्हावे, अशी मागणी संभाजीनगरवासीयांनी केली आहे.

No comments: