Header Ads

लेह-लडाख येथे डॉ. अनिल काळबांडे यांना आंतरराष्ट्रीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार!

 लेह-लडाख येथे डॉ. अनिल काळबांडे यांना आंतरराष्ट्रीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार! साहित्य, शिक्षण व प्रबोधन क्षेत्रातील कार्याची जागतिक पातळीवर दखल.


~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

सिद्धार्थ कदम पुसद तालुका प्रतिनिधी.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

उमरखेड तालुक्यातील मुळावा येथील प्रख्यात साहित्यिक, कवी तथा प्रबोधनकार प्रा. डॉ. अनिल काळबांडे यांना लेह-लडाख येथे आयोजित आंतरराष्ट्रीय साहित्य संमेलनात प्रतिष्ठेचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. साहित्य, शिक्षण आणि सामाजिक प्रबोधन क्षेत्रात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली आहे.

मूळचे ग्रामीण भागातील असलेल्या डॉ. अनिल काळबांडे यांनी आपल्या शैक्षणिक, साहित्यिक व सामाजिक कार्याच्या बळावर स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. महाविद्यालयीन शिक्षण क्षेत्रात मराठी विभागप्रमुख म्हणून कार्यरत असताना त्यांनी प्रदीर्घ काळापासून साहित्य आणि प्रबोधनाची समृद्ध परंपरा जोपासली आहे. मराठी साहित्याबरोबरच आंबेडकरी विचार व साहित्य जागतिक पातळीवर पोहोचविण्यासाठी त्यांनी केलेले योगदान उल्लेखनीय मानले जाते.

लेह-लडाख येथे झालेल्या या आंतरराष्ट्रीय संमेलनात सार्क संघटनेचे युवा दूत तथा संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ. मनीष गवई यांच्या संघटनेच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. संमेलनाच्या अध्यक्षा अरुणा सबाने, लेह विद्यापीठाच्या कुलगुरू प्रतिनिधी तथा सर्व भाषा विभागाच्या डीन डॉ. तस्लीन झांगो यांच्या हस्ते डॉ. काळबांडे यांना शाल, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी उद्घाटक तथा महानगरपालिकेच्या माजी आयुक्त संगीता छायगुडे, शब्द संमेलनाचे प्रमुख संजय सिंगलवार, उपाध्यक्ष शशी डंभारे, समाजसेवी डॉ. अजय नरवाडे, ज्येष्ठ छायाचित्रकार रमेश भागवत यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

डॉ. अनिल काळबांडे यांनी आपल्या साहित्यनिर्मितीतून सामाजिक परिवर्तन, समता, बंधुता आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभावी प्रचार व प्रसार केला आहे. मराठी साहित्याला व्यापक स्तरावर पोहोचविण्याबरोबरच आंबेडकरी साहित्याची विचारधारा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्यासाठी त्यांनी सातत्याने कार्य केले आहे.

या आंतरराष्ट्रीय पुरस्कारामुळे उमरखेड तालुक्यासह औदुंबर नगरीच्या साहित्यिक वैभवात भर पडल्याची भावना व्यक्त होत आहे. डॉ. काळबांडे यांच्या या यशाबद्दल ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रविचंद्र हडसनकर, प्रा. जगदीश कदम, प्राचार्य नागनाथ पाटील, डॉ. श्रीपाल सबनीस, अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. दीपककुमार खोब्रागडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

ग्रामीण भागातून साहित्य, शिक्षण आणि सामाजिक प्रबोधनाच्या माध्यमातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण करणाऱ्या डॉ. अनिल काळबांडे यांच्या या सन्मानामुळे उमरखेडच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

No comments:

Powered by Blogger.