भरदिवसा चोरट्याचा धुमाकूळ! ठिकपुर्लीत बंद घर फोडून साडेचार लाखांचा ऐवज लंपास.
भरदिवसा चोरट्याचा धुमाकूळ! ठिकपुर्लीत बंद घर फोडून साडेचार लाखांचा ऐवज लंपास राधानगरी तालुक्यात खळबळ; सोन्याचे दागिने आणि रोकड घेऊन अज्ञात चोरटा फरार.
ठिकपुर्ली (ता. राधानगरी) | प्रतिनिधी : विजय बकरे.
--------+-------------------------------------------------
राधानगरी तालुक्यातील ठिकपुर्ली गावात भरदिवसा झालेल्या धाडसी घरफोडीच्या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घराला कुलूप असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून तब्बल ४ लाख ७० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. सोमवारी (दि. २९) सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत ही घटना घडली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ठिकपुर्ली येथील रमेश रावण आगळे हे कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यावेळी घर बंद असल्याचे पाहून चोरट्याने मुख्य दरवाजाचा कडी-कोयंडा तोडत घरात प्रवेश केला. त्यानंतर बेडरूममधील लोखंडी तिजोरीवर डल्ला मारत त्यातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली.
चोरीस गेलेल्या मुद्देमालामध्ये ४० ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण (किंमत ३ लाख २० हजार रुपये), १५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे नेकलेस (किंमत १ लाख २० हजार रुपये) तसेच ३० हजार रुपयांची रोकड, असा एकूण ४ लाख ७० हजार रुपयांचा ऐवज असल्याचे सांगण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच आगळे यांनी राधानगरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून चोरट्याच्या हालचालींचा मागोवा घेण्यास सुरुवात केली असून, उपलब्ध पुरावे व परिसरातील माहितीच्या आधारे तपास सुरू आहे. पोलीस निरीक्षक अजित सिद यांच्या मार्गदर्शनाखाली म.पो.स.ई. पवार पुढील तपास करीत आहेत.

No comments: