पोलन ॲग्रो झिम्मा-फुगडी स्पर्धेत सोनाळीचा 'नागनाथ ग्रुप' महाविजेता; धुंदवडे उपविजेता
पोलन ॲग्रो झिम्मा-फुगडी स्पर्धेत सोनाळीचा 'नागनाथ ग्रुप' महाविजेता; धुंदवडे उपविजेता ग्रामीण महिलांच्या पारंपरिक लोककलेला पोलन किसानचा उत्स्फूर्त मंच.
कळे प्रतिनिधी सुनिल मोळे ९८९०९०८०४७.
--------------------------------------------------
धुंदवडे :- ग्रामीण भागातील महिलांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळावे, तसेच महाराष्ट्राची समृद्ध पारंपरिक लोकसंस्कृती, पारंपरिक खेळ आणि लोककला पुढील पिढीपर्यंत जतन व्हावी, या उदात्त उद्देशाने गणपती विसर्जनाच्या निमित्ताने 'पोलन किसान' (पोलन ॲग्रो मिनरल्स प्रा. लि.) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 'पारंपरिक लोककला झिम्मा-फुगडी स्पर्धा २०२६' ला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कोपार्डेकर फार्म, गोतेवाडी येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विविध गावांमधून आलेल्या महिला व युवतींच्या उत्साहपूर्ण सहभागामुळे संपूर्ण परिसरात पारंपरिक लोककलेचा जल्लोष पाहायला मिळाला.
स्पर्धेचे उद्घाटन व बक्षीस वितरण समारंभ पोलन ॲग्रो मिनरल्स प्रा. लि.चे सीएमडी सागर कोपार्डेकर आणि व्यवस्थापकीय संचालिका अस्मिता कोपार्डेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी बोलताना मान्यवरांनी महिलांच्या अंगभूत कलागुणांना प्रोत्साहन देणे आणि पारंपरिक सण, उत्सव व लोकखेळांची परंपरा जिवंत ठेवणे हाच या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे सांगितले.
सकाळी १० वाजता सुरू झालेल्या या स्पर्धेत सांघिक झिम्मा-फुगडीसह घागर घुमवणे, सूप नाचवणे, चुई-फुई, घोडा-घोडा, काटवट कणा, उखाणे तसेच पारंपरिक वेशभूषा अशा विविध स्पर्धांनी चांगलीच रंगत आणली. पारंपरिक वेशभूषेत नटून-थटून आलेल्या महिला, झिम्मा-फुगडीतील तालबद्ध सादरीकरण आणि विविध लोकखेळांमधील उत्साह यामुळे कार्यक्रमाला खऱ्या अर्थाने उत्सवी स्वरूप प्राप्त झाले होते.
सांघिक झिम्मा-फुगडी या मुख्य स्पर्धेत सोनाळी येथील नागनाथ ग्रुपने आपल्या अप्रतिम सादरीकरणाने प्रथम क्रमांक पटकावत २१ हजार १०१ रुपयांचे पारितोषिक मिळवत महाविजेतेपद पटकावले. धुंदवडे येथील मोरजाई ग्रुपने द्वितीय क्रमांक मिळवत ११ हजार १०१ रुपये, तर गोतेवाडीच्या सावित्रीच्या लेकी ग्रुपने तृतीय क्रमांक मिळवत ५ हजार ५५५ रुपयांचे पारितोषिक पटकावले.
सांघिक स्पर्धांबरोबरच वैयक्तिक स्पर्धांमध्येही महिलांनी आपले कौशल्य आणि पारंपरिक कलांचे दर्शन घडविले.
- *फुगडी स्पर्धा :* राधिका बेरकळ व साक्षी शिरोळकर - प्रथम, पल्लवी पाटील व सीमा पाटील - द्वितीय
- *घागर घुमवणे :* कमल नलवडे - प्रथम, राजश्री पाटील - द्वितीय
- *सूप नाचवणे :* रेश्मा - प्रथम, सुशिला सागावकर - द्वितीय
- *पारंपरिक वेशभूषा :* अनुराधा नलवडे - प्रथम, गायत्री गुरव - द्वितीय
- *उखाणे स्पर्धा :* संजीवनी वैद्य - प्रथम, रंजना किरुळकर - द्वितीय
- *काटवट कणा :* तेजश्री पाटील - प्रथम, सोनाली बेरकळ - द्वितीय
- *घोडा-घोडा :* कोमल कुपले - प्रथम, वैष्णवी - द्वितीय
- *चुई-फुई :* रुपाली आखुणे - प्रथम, अक्षरा गोते - द्वितीय
सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिके व आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. विशेष म्हणजे संपूर्ण स्पर्धेचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध आणि विनामूल्य करण्यात आले होते.
या कार्यक्रमास परिसरातील ग्रामस्थ, महिला भगिनी तसेच पोलन ॲग्रो मिनरल्सचे पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामीण महिलांना आपल्या पारंपरिक कलांचे सादरीकरण करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल 'पोलन किसान' परिवाराच्या या स्तुत्य उपक्रमाचे परिसरातून सर्वत्र कौतुक होत आहे.

No comments: