चुलत्याच्याच घरावर डल्ला! २४ तासांत मिरज ग्रामीण पोलिसांकडून चोरीचा पर्दाफाश; १.३१ लाखांचा ऐवज जप्त
चुलत्याच्याच घरावर डल्ला! २४ तासांत मिरज ग्रामीण पोलिसांकडून चोरीचा पर्दाफाश; १.३१ लाखांचा ऐवज जप्त.
सांगली जिल्हा प्रतिनिधी.
राजु कदम.
-----------------------------
मिरज तालुक्यातील खंडेराजुरी येथील घरफोडीच्या गुन्ह्याचा अवघ्या २४ तासांत उलगडा करत मिरज ग्रामीण पोलिसांनी चोरीस गेलेले १ लाख ३१ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत केले आहेत. या प्रकरणात फिर्यादीच्या नात्यातीलच एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
२४ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर दरम्यान फिर्यादी यांच्या घरातील कपाटावर ठेवलेल्या पर्समधून अज्ञात चोरट्याने सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. चोरीमध्ये मंगळसूत्र, सोन्याचे गंठण, कानातील टॉप्स, चांदीचे पैजण आणि मासोळ्या असा एकूण २१ ग्रॅम सोन्याचा व चांदीचा ऐवज चोरीला गेला होता.
आरोपी नात्यातीलच निघाला
गुन्हे प्रकटीकरण शाखेने तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे दीपक गणपती पाटील (वय ३४, रा. गवरदेवीवाडी, बेडग, ता. मिरज) याला बेडग–नरवाड रस्त्यावर सापळा रचून ताब्यात घेतले.
चौकशीत आरोपीने कबुली दिली की, तो पत्नीसमवेत आपल्या चुलते हरीशचंद्र पाटील यांच्या घरी गेला होता. घरातील मंडळी शेतात व गोठ्यात गेल्याची संधी साधून कपाटावरील पर्समधील दागिने चोरून नेल्याची कबुली त्याने दिली.
१.३१ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
पोलिसांनी आरोपीकडून खालील मुद्देमाल जप्त केला:
सोन्याचे मंगळसूत्र
सोन्याचे गंठण
सोन्याचे कानातील टॉप्स
चांदीचे पैजण
चांदीच्या मासोळ्या
एकूण किंमत : ₹१,३१,०००
पोलिसांचे पथक
पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमितकुमार पाटील यांच्या नेतृत्वाखालील गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.
पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास मिरज ग्रामीण पोलीस ठाणे करीत आहे.

No comments: