Header Ads

'शांताई बेघर निवारा केंद्रा'ची झाली मुहूर्तमेढ '

 'शांताई बेघर निवारा केंद्रा'ची झाली मुहूर्तमेढ

सिद्धार्थ कदम

पुसद तालुका प्रतिनिधी.

---------------------------

पुसद:

आईच्या सेवेची तळमळ आणि त्यातून निर्माण झालेली सामाजिक जाणीव यातून पुसद तालुक्यात निराधार आणि बेघरांना मायेचा आधार देणारा एक नवा सेवाभावी अध्याय सुरू झाला आहे. स्वर्गीय सौ.शांताबाई दत्तात्रय जाधव यांच्या सुवासिनी जेवण कार्यक्रमाचे औचित्य साधून कर्मयोगी संत गाडगेबाबा महाराज स्मृतीस्थळ, पार्डी रोड, निंबी येथे ह.भ.प. श्री ज्ञानेश्वर महाराज केसाळे यांच्या सुश्राव्य कीर्तनाच्या पावन सानिध्यात 'शांताआई बेघर निवारा केंद्रा'ची अधिकृत घोषणा करून मुहूर्तमेढ रोवण्यात आली.या केंद्राची संकल्पना गजानन जाधव यांच्या मातृसेवेतूनच साकारली असून, त्यांनी आपल्या मातोश्रींचे सुमारे ५ ते ६ वर्षे चाललेले संपूर्ण आजारपण स्वतः अहोरात्र सेवा-शुश्रूषा करून काढले.आईच्या निधनानंतर समाजातील अनेक असहाय्य,आजारी आणि बेघर वृद्धांची होणारी दुर्दशा पाहून, ज्यांना कोणीच सांभाळणारे नाही अशांची सेवा हीच खरी मातृसेवा ठरेल या भावनेतून आईला स्मरणात ठेवून या केंद्राची सुरुवात करण्यात आली आहे.  

या सेवाभावी उपक्रमाची घोषणा होताच मदतीचा ओघ सुरू झाला असून स्वर्गीय सतीशभाऊ बयास यांच्या जयंती निमित्त श्री. मनीषभाऊ शहा यांनी केंद्राच्या शेड उभारणीसाठी १,११,१०१/- रुपयांचे दान जाहीर केले. तसेच याच कार्यक्रमात 'माणुसकीची भिंत' परिवाराच्या वतीने गजानन इंगोले (मोती नगर) यांना इलेक्ट्रिक सायकल सुपूर्द करून मोलाची मदत करण्यात आली. संस्थेला कायमस्वरूपी हक्काची जागा मिळेपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात कर्मयोगी संत गाडगेबाबा स्मृती स्थळानजीक गजानन जाधव यांच्या शेतातील सुमारे ५,००० चौरस फूट जागेवर हे केंद्र विकसित केले जात असून,यातील दीड ते दोन हजार चौरस फूट जागेवर पक्के व सुरक्षित शेड उभारले जाईल.उर्वरित जागेवर सुंदर बाग (गार्डन),वॉकिंग ट्रॅक तसेच वृद्धांच्या आरोग्याकरिता योगा करण्याची स्वतंत्र जागा विकसित केली जाणार असून दाखल होणाऱ्या बेघरांना निवास,दोन वेळचे भोजन आणि दैनंदिन सुविधा पूर्णपणे मोफत मिळतील.

या निवारा केंद्रामध्ये ज्यांना कोणीच नातेवाईक अथवा सांभाळणारे कुटुंब नाही अशांना प्राधान्याने प्रवेश दिला जाईल.तसेच ज्या वृद्धांना मुले अथवा नातेवाईक असूनही ते त्यांचा सांभाळ न करता दुर्दशा करत असतील,तर केवळ तात्पुरता आश्रय न देता संबंधितांना रितसर कायदेशीर नोटीस पाठवून ज्येष्ठांना त्यांच्या हक्काच्या संपत्तीवर कायदेशीर अधिकार मिळवून दिला जाईल; या संपूर्ण कायदेशीर सल्ला,संरक्षण व मार्गदर्शनासाठी ॲड.नितीन विजयराव जाधव,पुसद (मो. ९३०७९७७१९५ / ८८०५६७९९९९) हे विधी सल्लागार म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत.यानंतर केंद्रात दाखल वृद्धांच्या नियमित आरोग्य तपासणी व उपचारांसाठी डॉ.विहार बिडवाई (मो. ९८२२२९९१७४) यांचे बहुमोल वैद्यकीय सहकार्य लाभणार आहे.समाजातील दानशूर नागरिकांनी या मानवतावादी कार्यात सढळ हाताने सहकार्य करावे,असे आवाहन शेतीनिष्ठ शेतकरी दत्तात्रय जाधव,गजानन दत्तात्रय जाधव (मो. ९८८१७५८८९९) सप्तक अंजली वादक पंकज पाल महाराज व 'माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशन' (पुसद) परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.याप्रसंगी मिशन ग्रीन वसुंधरा बहुउद्देशीय संस्था,रुग्ण मित्र फाउंडेशन,गुरुदेव सेवा मंडळ,सप्त खंजिरी वादक संघ महाराष्ट्र राज्य, गणेश धर्माळे सर निंबी,पार्डी परिसरासह पुसद परिसरातील मान्यवर मंडळी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Powered by Blogger.