Header Ads

जातीत फूट पाडण्याचे षड्यंत्र; सांगलीत अनुसूचित जाती उपवर्गीकरण सलोखा परिषद

 जातीत फूट पाडण्याचे षड्यंत्र; सांगलीत अनुसूचित जाती उपवर्गीकरण सलोखा परिषद.

मिरज-कुपवाड प्रतिनिधी : राजू कदम | फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र

सांगली: अनुसूचित जाती उपवर्गीकरणाच्या पार्श्वभूमीवर राज्यात निर्माण झालेल्या सामाजिक वातावरणात समाजात सलोखा आणि ऐक्य टिकवण्याच्या उद्देशाने सांगली येथे अनुसूचित जाती उपवर्गीकरण सलोखा परिषदेचे आयोजन करण्यात आले. या परिषदेत फुले-शाहू-आंबेडकर-साठे विचारांचे अभ्यासक सचिन बगाडे यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थितांना संबोधित केले.

सचिन बगाडे यांनी आपल्या भाषणात महाराष्ट्रातील सामाजिक व राजकीय परिस्थितीवर भाष्य करत अनुसूचित जाती उपवर्गीकरणाच्या समर्थनात आणि विरोधात सुरू असलेल्या मोर्चांमुळे समाजात मतभेद निर्माण होत असल्याचे सांगितले. त्यांनी असा आरोप केला की, जाती-जातीत फूट पाडणे, जातीय तेढ निर्माण करणे आणि महापुरुषांविरोधात बोलण्याचे षड्यंत्र रचले जात आहे.

परिषदेच्या अध्यक्षस्थानी प्रा. गौतमीपुत्र कांबळे होते, तर उद्घाटन प्रा. राम कांबळे यांच्या हस्ते झाले.

सलोखा राखण्याचे आवाहन

अध्यक्षीय भाषणात प्रा. गौतमीपुत्र कांबळे म्हणाले की, दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असताना सांगलीत दोन्ही समाजांचे प्रतिनिधी एकत्र येऊन सलोखा टिकवण्याची भूमिका घेत आहेत, ही सकारात्मक बाब आहे. सध्या दोन्ही समाजांमध्ये विष पेरले जात असून ते दूर करून ऐक्याचे वातावरण निर्माण केले पाहिजे, असे त्यांनी आवाहन केले.

मान्यवरांची उपस्थिती

या परिषदेत सचिन आवळे, गैब्रिएल तिवडे, सुजाता पवार, डॉ. सचिन सवाखंडे, डॉ. नितीन गौधळे, संगीता शिंदे, प्रा. कैलास काळे यांनी मनोगत व्यक्त केले. सुरेश दुधगावकर यांनी प्रास्ताविक केले, तर किरणराज कांबळे यांनी सूत्रसंचालन केले.

No comments:

Powered by Blogger.