Header Ads

हार्डवेअर दुकान फोडणारा CCTV मुळे जाळ्यात!यवतमाळच्या नेरमधील चोरी उघड; ८,२०० रुपयांचा मुद्देमाल जप्त, एक आरोपी ताब्यात.

 हार्डवेअर दुकान फोडणारा CCTV मुळे जाळ्यात!यवतमाळच्या नेरमधील चोरी उघड; ८,२०० रुपयांचा मुद्देमाल जप्त, एक आरोपी ताब्यात.

---------------------------------

यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी, 

सिद्धार्थ कदम

---------------------------------

यवतमाळ जिल्ह्यातील नेर येथील हार्डवेअर दुकान फोडून रोख रक्कम चोरी करणाऱ्या अज्ञात आरोपींचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ (दारव्हा उपविभाग) पथकाला मोठे यश मिळाले आहे. पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेत चोरीतील ८,२०० रुपये रोख मुद्देमाल जप्त केला असून दुसरा आरोपी अद्याप फरार आहे..

२२ सप्टेंबर रोजी नेर परिसरात पेट्रोलिंग सुरू असताना पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की चोरीतील संशयित नेर–अमरावती रोडवरील प्रगती ले-आऊटमध्ये उभा आहे. पोलिसांनी तात्काळ सापळा रचून तेजस पंडित गणवीर (वय २२, रा. नवाबपुरा, नेर) याला ताब्यात घेतले.

सुरुवातीला आरोपीने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज दाखवत चौकशी केली असता त्याने संकेत उर्फ चाबी रामदास धोटे याच्यासोबत हार्डवेअर दुकानाचे शटर तोडून गल्ल्यातील पैसे चोरल्याची कबुली दिली.

आरोपीच्या अंगझडतीत ५०० रुपयांच्या १२ नोटा आणि १०० रुपयांच्या २२ नोटा, असे एकूण ८,२०० रुपये जप्त करण्यात आले. उर्वरित चोरीची रक्कम दारू व जेवणावर खर्च केल्याची माहिती आरोपीने दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी पोलीस स्टेशन नेर येथे दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्यात पुढील कारवाईसाठी आरोपी व जप्त मुद्देमाल नेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे. दुसऱ्या फरार आरोपीचा शोध सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, पोलीस निरीक्षक सतीश चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवशंकर कार्यदे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

No comments:

Powered by Blogger.