कुपवाड एमआयडीसीत चोरट्यांचा कारखान्यावर डल्ला! कुलूप तोडून १.२३ लाखांचा ऐवज लंपास....
कुपवाड एमआयडीसीत चोरट्यांचा कारखान्यावर डल्ला! कुलूप तोडून १.२३ लाखांचा ऐवज लंपास..
कुपवाड एमआयडीसी परिसरात चोरट्यांनी बंद कारखाना लक्ष्य करत लाखोंच्या ऐवजावर हात साफ केला आहे. खारे मळा येथील राजेंद्र गुंडाप्पा खांडेकर यांच्या भागीदारीतील ‘खांडेकर अँड कंपनी’ कारखान्याचे आणि कार्यालयीन केबिनचे कुलूप तोडून १ लाख २३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे औद्योगिक परिसरातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ सप्टेंबर ते २४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत कुपवाड एमआयडीसीतील प्लॉट क्रमांक जे-२४ येथे ही चोरी झाली. अज्ञात चोरट्याने कारखान्याचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर कारखान्यातील लाल
रंगाचे वेल्डिंग मशीन, चार इंडक्शन मोटारी, साहित्य वाहून नेण्यासाठी वापरला जाणारा लोखंडी गाडा आणि ५० मीटर कॉपर केबल असा मुद्देमाल चोरून नेला.
चोरीस गेलेल्या साहित्याची एकूण किंमत १ लाख २३ हजार ५०० रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात १३ ऑक्टोबर २०२६ रोजी मध्यरात्री १२ वाजून २६ मिनिटांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५(अ), ३३१(३) आणि ३३१(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोरट्यांचा माग काढण्याचे पोलिसांसमोर आव्हान!
या चोरीमागे कोणाचा हात आहे, चोरट्यांनी कारखान्याची रेकी केली होती का आणि चोरीचा मुद्देमाल कुठे नेण्यात आला, याचा तपास सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार शिंदे करीत आहेत.

No comments: