सत्यनारायण तालीम ठरली गणराया अवॉर्डची मानकरी कळे पोलिसांतर्फे गणेश मंडळांना पुरस्कारांचे वितरण; ५४ गावांतील १४३ मंडळांचा सहभाग
सत्यनारायण तालीम ठरली गणराया अवॉर्डची मानकरी
कळे पोलिसांतर्फे गणेश मंडळांना पुरस्कारांचे वितरण; ५४ गावांतील १४३ मंडळांचा सहभाग
कळे प्रतिनिधी
साईश मोळे
९५९५३१६२६६
कळे : कळे पोलीस ठाण्याच्यावतीने आयोजित गणराया अवॉर्ड स्पर्धेत सत्यनारायण तालीम (कळे) यांनी प्रथम क्रमांक पटकावला. कळे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ५४ गावांमधील १४३ गणेश मंडळांनी या उपक्रमात सहभाग घेतला.
उत्कृष्ट स्टेज शो स्पर्धेत कळे येथील सत्यनारायण तालीम, नवनाथ मंडळ, अभिमन्यू मित्र मंडळ, धर्मराज तालीम या मंडळांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ क्रमांक मिळाला.
उत्कृष्ट रोड शो स्पर्धेत कळे येथील शिवसेना, धर्मवीर मंडळ, धर्मराज तालीम यांनी प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकावला.
सहायक पोलीस निरीक्षक दीपक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. पोलीस उपनिरीक्षक हेमा पाटील, अध्यापक रवींद्र मोळे (घरपण), विधिज्ञ अभिजीत पाटील (मरळी), शांतता समिती सदस्या रुपाली पाटील आणि प्रभावती चौगुले यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. पंचायत समिती सभापती रवींद्र पाटील आणि चाफेवाडीचे पोलीस पाटील संजय पाटील यांची उपस्थिती होती.
यावेळी मरळी येथील आनंदा कृष्णा पाटील यांचे व्यसनमुक्ती व डॉल्बीमुक्त उत्सव या विषयावर व्याख्यान झाले. गणेशोत्सवात सामाजिक बांधिलकी जपणे, ध्वनिप्रदूषण टाळणे आणि शांततेत उत्सव साजरा करण्याचे महत्त्व त्यांनी विशद केले.
गणेशोत्सव अधिक शिस्तबद्ध, सामाजिक भान जपणारा आणि पर्यावरणपूरक व्हावा, या उद्देशाने एक गाव, एक गणपती उपक्रम, डॉल्बीमुक्त मिरवणूक तसेच सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या १६ गावांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. त्यामध्ये गोठे, साळवाडी, पडसाळी, वाळोली, नवलेवाडी, वाळवेकरवाडी, निवाचीवाडी, जाधववाडी, सुंभेवाडी, गोठणे, बळपवाडी, तांदुळवाडी, आतकीरवाडी, काळजवडे, पिसात्री आणि मोरेवाडी या गावांचा समावेश होता.

No comments: