Header Ads

अमरावतीत अवैध LPG गॅसचा काळाबाजार उघडकीस! सिलेंडरमधून १ ते २ किलो गॅस काढून पुन्हा ग्राहकांना विक्री; दोघांना रंगेहात अटक, ९.५४ लाखांचा मुद्देमाल जप्त.

 अमरावतीत अवैध LPG गॅसचा काळाबाजार उघडकीस!

सिलेंडरमधून १ ते २ किलो गॅस काढून पुन्हा ग्राहकांना विक्री; दोघांना रंगेहात अटक, ९.५४ लाखांचा मुद्देमाल जप्त.

अमरावती | पी. एन. देशमुख, जिल्हा प्रतिनिधी

अमरावती शहरात घरगुती LPG सिलेंडरमधून बेकायदेशीरपणे गॅस काढून त्याची पुन्हा विक्री करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. माता खिडकी, महाजनपुरा परिसरात सुरू असलेल्या या अवैध प्रकारावर अमरावती गुन्हे शाखेने कारवाई करत दोघांना रंगेहात अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुपेश मुकुंदराव आठवले (वय २५) आणि ऋतिक संतोष प्रधाने (वय २५), दोघेही रा. महाजनपुरा, अमरावती, हे LPG सिलेंडरमधून प्रत्येकी सुमारे १ ते २ किलो गॅस काढत असल्याचा आरोप आहे. गॅस काढल्यानंतर हे सिलेंडर पुन्हा ग्राहकांना दिले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

या माहितीच्या आधारे अमरावती गुन्हे शाखेच्या पथकाने माता खिडकी परिसरातील महाजनपुरा येथे छापा टाकला. कारवाईदरम्यान दोन्ही संशयितांना रंगेहात पकडण्यात आले. पोलिसांनी या कारवाईत तब्बल ९ लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती आहे.

ही कारवाई वरिष्ठ अधिकारी दिनेश दहातोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष वाकोडे यांच्या पथकाने केली. अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी खोलापुरी गेट पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

घरगुती वापराच्या LPG सिलेंडरमधून गॅस काढण्याच्या या प्रकारामुळे ग्राहकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

No comments:

Powered by Blogger.