Header Ads

गोळीबारातील खून प्रकरणात तिघांना आजीवन कारावासाची शिक्षा

 गोळीबारातील खून प्रकरणात तिघांना आजीवन कारावासाची शिक्षा

किरकोळ वादातून झालेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू; कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल.


कोल्हापूर : गोळीबार करून खून केल्याच्या गंभीर प्रकरणात कोल्हापूर येथील मा. ए. एम. पाटील, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयाने तीन आरोपींना आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली. या निकालामुळे गोळीबाराच्या प्रकरणातील आरोपींना न्यायालयाने कठोर शिक्षा ठोठावली आहे.

या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाणे गु.र.नं. ११८/२०२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील फिर्यादी रविंद्र बाबासाहेब गायकवाड (वय ४१, व्यवसाय पेंटिंग, रा. रमणमळा पोस्ट ऑफिसजवळ, कोल्हापूर) यांनी तक्रार दिली होती.

या गुन्ह्यात राजेंद्र आनंदा सावंत (वय ६३), अभिजीत राजेंद्र सावंत (वय ३२) आणि धैर्यशील राजेंद्र सावंत (वय ३४) यांना आरोपी करण्यात आले होते. तिघेही राजदासाहेब गायकवाड हौसिंग सोसायटी, फ्लॅट नं. १२९/२, पत्रकारनगर, विचारमाळा, कोल्हापूर येथील रहिवासी असल्याचे नमूद आहे.

या घटनेत हेमंत बाबासाहेब गायकवाड (वय २९, रा. रमणमळा पोस्ट ऑफिसजवळ, कोल्हापूर) यांचा मृत्यू झाला, तर ईश्वरीकांत गायकवाड हे जखमी झाले होते.

२४ मे २०२३ रोजी दुपारी सुमारे २ ते २.३० वाजण्याच्या दरम्यान रमणमळा पोस्ट ऑफिस चौक परिसरात, सीपीआर हॉस्पिटल कोल्हापूर ते कसबा बावडा जाणाऱ्या रस्त्यावर ही घटना घडली होती. किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून गोळीबार झाल्याचे तपासात निष्पन्न झाले.

या प्रकरणाचा तपास अमृत जी. मराठे यांनी केला. न्यायालयात सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता सुजाता एस. इंगळे यांनी बाजू मांडली. उपलब्ध पुरावे व साक्षीदारांच्या आधारे न्यायालयाने आरोपी तिघांना दोषी ठरवत आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली.

या निकालामुळे कोल्हापुरातील गोळीबाराच्या गंभीर प्रकरणात न्यायालयाने कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

No comments:

Powered by Blogger.