ज्येष्ठांचा सन्मान अन् मातीशी नातं ; सावर्डेत गांधी जयंतीनिमित्त अनोखा सामाजिक उपक्रम.
ज्येष्ठांचा सन्मान अन् मातीशी नातं ; सावर्डेत गांधी जयंतीनिमित्त अनोखा सामाजिक उपक्रम.
कळे प्रतिनिधी
साईश मोळे
९५९५३१६२६६
कळे:- महात्मा गांधी जयंती आणि ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून सावर्डे येथे ज्येष्ठांचा सन्मान आणि वृक्षसंवर्धनाचा अनोखा संगम साधण्यात आला. कळे विभागाचे प्रशासकीय अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत ज्येष्ठ नागरिकांच्या पदस्पर्शाने विविध फळझाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक कदम यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, ज्येष्ठ नागरिक हे समाजाच्या अनुभवाचे, संस्कारांचे आणि संघर्षाचे जिवंत विद्यापीठ आहेत. ज्येष्ठांचा सन्मान हा केवळ औपचारिकतेपुरता मर्यादित न राहता त्यांच्या अनुभवाचा उपयोग पुढील पिढी घडविण्यासाठी झाला पाहिजे. वृक्षारोपणापेक्षा वृक्षसंवर्धन महत्त्वाचे असून लावलेले प्रत्येक झाड जगविण्याची जबाबदारी समाजाने स्वीकारली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
मोहन बोरगावकर यांनी तरुण पिढीने ज्येष्ठांच्या जीवनप्रवासातून संयम, संघर्ष आणि सामाजिक बांधिलकीचे धडे घेण्याची गरज व्यक्त केली. ज्येष्ठ माणूस अनुभवाची सावली देतो, तर वृक्ष भविष्यातील पिढीला जीवनाची सावली देतो, त्यामुळे दोघांचेही जतन हीच समाजाची खरी संस्कृती आहे, असे त्यांनी सांगितले.
सामाजिक कार्यकर्ते प्रतापसिंह काळे यांनी प्रास्ताविकात सांगितले की, "ज्येष्ठांनी आयुष्यभर समाजाला अनुभवाची सावली दिली. आज त्यांच्या पदस्पर्शाने रुजलेली ही रोपे उद्याच्या पिढीला सावली, फळे आणि पर्यावरणाचा श्वास देतील. त्यामुळे हा केवळ वृक्षारोपणाचा कार्यक्रम नसून अनुभव आणि पर्यावरणाचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प आहे."
यावेळी सामाजिक कार्यकर्त्या सावित्री काळे, सरपंच संभाजी कापडे, एम. एल. पाटील, शंकर पाटील, श्रीपती सातपुते, सखाराम बच्चे, यल्लापा काळे, तसेच सावर्डेतील ज्येष्ठ नागरिक पिंटू हंजे, सचिन सुतार, सदाशिव काळे, केरबा काळे, भिकाजी काळे, वासुदेव काळे, अमित काळे आणि पोलीस कॉन्स्टेबल पंडित पवार उपस्थित होते.
ज्येष्ठांचा अनुभव जपा, झाडे जगवा आणि पुढील पिढीसाठी हिरवा वारसा निर्माण करा, हा संवेदनशील संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

No comments: