वाढदिवसाचा अनोखा सोहळा! केकसोबत रक्तदानाचा सामाजिक संकल्प; वनिताताई सकटे यांच्या अभिष्टचिंतनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न!
वाढदिवसाचा अनोखा सोहळा! केकसोबत रक्तदानाचा सामाजिक संकल्प; वनिताताई सकटे यांच्या अभिष्टचिंतनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न!
आरोग्याची काळजी, रक्तदानाची जाण; हाच खरा वाढदिवसाचा सन्मान!
सांगली | प्रतिनिधी
वाढदिवस म्हटले की केक, शुभेच्छा आणि जल्लोष... मात्र या पारंपरिक उत्सवाला सामाजिक सेवेची जोड देत जयभीम क्रांती सेनेच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा वनिताताई सकटे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. रक्तदानातून गरजू रुग्णांना जीवनदान देण्याचा संदेश देणारा हा उपक्रम उत्साहात पार पडला.
आद्यक्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या २३२ व्या जयंतीचे औचित्य साधून, जयभीम क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष मा. गॅब्रिएल भाऊ तिवडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे नगरसेवक मा. सागर वनखंडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, आद्यक्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर वनिताताई सकटे यांचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला आणि उपस्थित मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
श्री सिद्धिविनायक गणपती कॅन्सर हॉस्पिटलच्या सहकार्याने रक्तदान शिबिराला सुरुवात झाली. या शिबिरात युवक-युवतींसह संघटनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत रक्तदान केले. प्रत्येक रक्तदात्याला प्रोत्साहनपर आकर्षक भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी संस्थापक अध्यक्ष गॅब्रिएल भाऊ तिवडे, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष तात्यासाहेब देवकुळे, पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष प्रशांतभाऊ आवळे, सांगली जिल्हाध्यक्ष पै. विक्रम मोहिते, मिरज तालुका कार्याध्यक्ष विनोद तांदळे, सांगली जिल्हा संघटक अजित सदामते, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा मीनाक्षीताई शिरसागर, शहर जिल्हा कार्याध्यक्ष घनश्याम थोरात, तासगाव तालुकाध्यक्ष राजू कांबळे, मिरज शहराध्यक्षा सुनीता तांदळे, लखन वारे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदानाचा घेतलेला हा सामाजिक वसा म्हणजेच खऱ्या अर्थाने माणुसकीचा उत्सव ठरला. वनिताताई सकटे यांच्या नेतृत्वातून महिला सक्षमीकरणासोबतच समाजसेवेचा आदर्शही अधोरेखित झाला.

No comments: