साताऱ्यात गांजा तस्करीचा पर्दाफाश; २५ किलो गांजा जप्त!
साताऱ्यात गांजा तस्करीचा पर्दाफाश; २५ किलो गांजा जप्त!
नेक्सॉन कारसह १६.३८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; पोलिसांची धडक कारवाई
सातारा | प्रतिनिधी – अमर इंदलकर
साताऱ्यात गांजा तस्करीचा मोठा डाव पोलिसांनी उधळून लावला आहे. शेंद्रे परिसरात सापळा रचून सातारा तालुका पोलिसांनी तब्बल २४ किलो ९६० ग्रॅम गांजा जप्त केला. या कारवाईत टाटा नेक्सॉन कार आणि दोन मोबाईलसह एकूण १६ लाख ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
२१ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सातारा-शेंद्रे मार्गावरील खानिसमोर परिसरात ही कारवाई करण्यात आली. गांजा विक्रीसाठी दोन इसम कारमधून येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी नियोजनबद्ध सापळा रचून सिल्व्हर रंगाची नेक्सॉन कार अडवली. तपासणीदरम्यान मोठ्या प्रमाणात गांजा आढळून आला.
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कामगिरी केली.
गांजाची किंमत ६ लाख २४ हजार, कारची किंमत १० लाख आणि दोन मोबाईलची किंमत १४ हजार रुपये असा एकूण १६.३८ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अभिजित गुरव करीत आहेत.
अंमली पदार्थ तस्करांना सातारा पोलिसांचा दणका; तस्करीच्या संपूर्ण साखळीचा शोध आता पोलिसांकडून घेतला जात आहे.

No comments: