Header Ads

सात वर्षे आठ महिने पोलिसांना गुंगारा; अखेर कडकनाथ घोटाळ्यातील फरार आरोपी जेरबंद!

 सात वर्षे आठ महिने पोलिसांना गुंगारा; अखेर कडकनाथ घोटाळ्यातील फरार आरोपी जेरबंद!

स्वराज्य ॲग्रो कंपनीच्या नावाखाली ६५ शेतकऱ्यांना ५६.३५ लाखांचा गंडा; आर्थिक गुन्हे शाखेची पहाटे धडक कारवाई, आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी.

सांगली | प्रतिनिधी

कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायातून भरघोस नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक करणाऱ्या स्वराज्य ॲग्रो कंपनीशी संबंधित गुन्ह्यात गेल्या सात वर्षे आठ महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला अखेर सांगली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने जेरबंद केले. प्रतीक दीपक कांबळे (वय ३४, रा. शिरगाव रोड, नागठाणे, ता. पलूस, जि. सांगली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गुरुवारी (दि. ५ नोव्हेंबर) पहाटे २.२० वाजता त्याला राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आले. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे.

कडकनाथच्या नावाखाली शेतकऱ्यांना लाखोंचा गंडा!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व त्याच्या साथीदारांनी संगनमताने स्वराज्य ॲग्रो कंपनी स्थापन केली होती. कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायातून मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवून फिर्यादी शिवाजी भानुदास चव्हाण यांच्यासह अन्य ६५ गुंतवणूकदार शेतकऱ्यांना कंपनीत गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करण्यात आले. फिर्यादींकडून एक लाख रुपये घेण्यात आले. तसेच कडकनाथ कोंबडी पालन युनिट देण्याबाबत करार करूनही त्यातील अटींचे पालन करण्यात आले नाही. वेळोवेळी खोटी आश्वासने देत गुंतवणूकदारांची एकूण ५६ लाख ३५ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे.

गुप्त माहिती अन् पोलिसांची धडक; नागठाण्यातून आरोपी ताब्यात

याप्रकरणी तासगाव पोलीस ठाण्यात २०१९ मध्ये गुन्हा क्रमांक ५७६/२०१९ नोंद करण्यात आला होता. भादंवि कलम ४२०, ४०६, ३४ आणि एमपीआयडी कायद्याच्या कलम ३ अन्वये गुन्हा दाखल आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून प्रतीक कांबळे हा सात वर्षे आठ महिने पोलिसांना गुंगारा देत फरार होता.

फरार आरोपींचा शोध घेण्याच्या विशेष मोहिमेदरम्यान आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत आरोपी नागठाणे येथे घरी येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सांगोला-मेटफळे, आटपाडी, विटा, कुंडल आणि वाळवा मार्गे नागठाणे गाठले. आरोपीच्या राहत्या घरी छापा टाकून त्याला जागीच ताब्यात घेत अटक करण्यात आली.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक स्वाती गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. या पथकात सहाय्यक पोलीस फौजदार रमेश कोळी, पोलीस हवालदार संदीप मोरे, विशाल भिसे, रिचर्ड स्वामी, पोलीस नाईक सचिन मोरे तसेच सायबर पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली बोबडे व पोलीस कॉन्स्टेबल कॅप्टन गुंडवडे यांचा सहभाग होता.

या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर, आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली करीत आहेत.

सात वर्षांपासून फरार असलेला आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकल्याने कडकनाथ घोटाळ्यातील आर्थिक फसवणुकीच्या तपासाला आता वेग येण्याची शक्यता आहे. गुंतवणूकदार शेतकऱ्यांचे पैसे नेमके कुठे गेले आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास महत्त्वाचा ठरणार आहे.

No comments:

Powered by Blogger.