ग्रामसभेचा विरोध झुगारून गायरनात वृक्षतोड रेंदाळमध्ये ग्रामस्थांचा उद्रेक : सोलर प्रकल्पाचे काम रोखले.
ग्रामसभेचा विरोध झुगारून गायरनात वृक्षतोड रेंदाळमध्ये ग्रामस्थांचा उद्रेक : सोलर प्रकल्पाचे काम रोखले.
सचिन कुंभार
रेंदाळ प्रतिनिधी
9021281100
रेंदाळ (ता. हातकणंगले) येथील गायरान जमिनीवरील प्रस्तावित सोलर प्रकल्पाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. गट क्रमांक ९८८ मधील गायरान जमिनीवर ग्रामसभेने यापूर्वी विरोध दर्शविला असतानाही वृक्षतोड करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या ठिकाणी अंदाजे १०० ते १५० वृक्षांची तोड झाल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत असून, संतप्त ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत काम रोखले.मे २०२६ मध्ये झालेल्या ग्रामसभेत प्रस्तावित सोलर प्रकल्पाला ग्रामस्थांनी स्पष्ट विरोध दर्शविला होता. असे असतानाही गायरान जमिनीवरील वृक्षतोड आणि प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
या प्रकाराची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी एकत्र येत सुरू असलेल्या कामाला विरोध केला. त्यानंतर जेसीबीसह संबंधित वाहने ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात आणण्यात आली. ग्रामसभेचा विरोध असताना नेमकी कोणाच्या परवानगीने वृक्षतोड करण्यात आली वृक्षतोडीसाठी आवश्यक शासकीय परवानग्या घेण्यात आल्या होत्या का? तसेच ग्रामपंचायत प्रशासनाने याबाबत कोणती भूमिका घेतली, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.गायरान जमीन ही सार्वजनिक मालमत्ता असून, तिचा वापर करताना ग्रामसभेचा ठराव, शासकीय नियम आणि पर्यावरणविषयक तरतुदींचे पालन होणे आवश्यक आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची महसूल विभाग, वन विभाग आणि संबंधित प्रशासनाने तातडीने चौकशी करावी, वृक्षतोडीची मोजणी करावी आणि जबाबदारांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
ग्रामसभेचा विरोध असताना वृक्षतोड झालीच कशी? या प्रश्नाचे उत्तर आता ग्रामपंचायत आणि संबंधित प्रशासनाला द्यावे लागणार असून, गायरान जमिनीच्या भवितव्याबाबत रेंदाळमध्ये वातावरण तापण्याची शक्यता आहे.

No comments: