Header Ads

द्राक्ष बागेतील लोखंडी अँगल चोरी करणारी टोळी जेरबंद! सांगली LCB ची धडाकेबाज कारवाई; ३० लाखांचा मुद्देमाल जप्त..

 द्राक्ष बागेतील लोखंडी अँगल चोरी करणारी टोळी जेरबंद! सांगली LCB ची धडाकेबाज कारवाई; ३० लाखांचा मुद्देमाल जप्त..


तासगाव | प्रतिनिधी. राजू कदम

द्राक्ष बागांसाठी वापरण्यात येणारे लोखंडी Y आकाराचे अँगल चोरून त्यांची विक्री करणाऱ्या टोळीचा सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तीन आरोपींसह एका बालअपचाऱ्याला ताब्यात घेण्यात आले असून, तब्बल ३० लाख ३ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

तासगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जरंडी येथील शेतातून १८ जून २०२६ रोजी द्राक्ष बागेचे ५०९ लोखंडी Y आकाराचे अँगल चोरीला गेले होते. याप्रकरणी तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास करताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, चोरी केलेले अँगल विक्रीसाठी महिंद्रा पिकअप आणि टाटा ट्रकमधून बेद्री चौक, तासगाव येथे आणले जाणार आहेत. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीत जरंडी येथून चोरी केलेले अँगल विक्रीसाठी आणल्याची माहिती समोर आली.

या कारवाईत प्रशांत बाळासो शिवे (वय ३१, रा. जोतिबानगर, तासगाव), सुयश काकासो जाधव (वय २३, रा. पळशी, ता. खानापूर), अविकुमार विश्वास मलमे (वय ३०, रा. नागाव-निमणी, ता. तासगाव) आणि एका बालअपचाऱ्याला ताब्यात घेण्यात आले.

असा आहे जप्त मुद्देमाल :

२ लाख ३ हजार ६०० रुपये किमतीचे ५०९ लोखंडी Y अँगल.

८ लाख रुपये किमतीची महिंद्रा बोलेरो पिकअप.

२० लाख रुपये किमतीचा टाटा सहा चाकी ट्रक.

असा एकूण ३० लाख ३ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

ताब्यात घेतलेले आरोपी, बालअपचारी आणि जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी तासगाव पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास तासगाव पोलीस करीत आहेत.

द्राक्ष बागांच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण ठरलेल्या या कारवाईमुळे शेती साहित्य चोरणाऱ्या टोळ्यांचे धाबे दणाणले आहेत.

No comments:

Powered by Blogger.