सार्वजनिक ठिकाणी आढळणारी जनावरे जप्त होणार.
सार्वजनिक ठिकाणी आढळणारी जनावरे जप्त होणार.
*****************************
संस्कार कुंभार
****************************
कोल्हापूर ता.14 : कोल्हापूर शहरात रस्त्यावर भटकणाऱ्या पाळीव आणि भटक्या जनावरांमुळे नागरिकांच्या जीवितास तसेच सुरक्षिततेस धोका निर्माण होत असल्याने कोल्हापूर महानगरपालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक ठिकाणी आढळणारी कोणतीही पाळीव किंवा भटकी जनावरे थेट जप्त केली जाणार असून ती परत देण्यात येणार नाही. प्राण्यांवर होणाऱ्या अन्यायकारक वागणुकीला आळा बसावा यासाठी प्राणी छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 335 मधील तरतुदींचा आधार घेत महापालिकेने ही कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये सार्वजनिक अथवा खाजगी परिसरातील जनावरे पकडण्याचा व पकडलेली जनावरे लिलाव करुन त्यापासून मिळणारे उत्पन्न महापालिकेत जमा करणेचा अधिकार महापालिकेस प्राप्त आहे. याबाबत महापालिकेने जाहिर आवाहन प्रसिध्द केले असून नियमांच्या उल्लंघनामुळे पाळीव जनावरांना अन्न-पाणी न पुरवणे, त्यांचा छळ करणे अथवा त्यांना रस्त्यावर सोडणे हे सर्व दंडनीय गुन्हे आहेत. महानगरपालिकेने जप्त करण्यात आलेली देशी जनावरे पांजरपोळ मध्ये ठेवली जातील. परंतु विदेशी प्रजाती अथवा ब्रीड प्रकारातील जनावरे स्थानिक बाजारात शेतक-यांना लिलावाद्वारे विक्रीस काढली जातील.
सदरची नोटीस दूधकट्टा किंवा डेअरी व्यवसायाशी संबंधित असलेल्या म्हैस प्रजातीच्या जनावरांवर लागू होणार नाही. तथापि, अशा जनावरांमुळे इतर कोणासही इजा होणार नाही याची खात्री संबंधितांनी घ्यावी, असेही महापालिकेने स्पष्ट केले आहे.
नागरिकांना आवाहन
महापालिकेने सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की जनावरांच्या मालकांनी स्वतःच्या पाळीव जनावरांची योग्य ती देखभाल करावी, त्यांना रस्त्यावर सोडू नये. महापालिकेने केलेल्या नियमांचे पालन करावे अन्यथा संबंधित जनावरे कायमची जप्त केली जातील.
Comments
Post a Comment