जात पंचायतीकडून कुटुंबाला बहिष्कृत; पाच लाख दंडाची मागणी, धमक्यांमुळे भीतीचे वातावरण.
जात पंचायतीकडून कुटुंबाला बहिष्कृत; पाच लाख दंडाची मागणी, धमक्यांमुळे भीतीचे वातावरण.
नरवाड (ता. मिरज) : नरवाड येथील लक्ष्मीनगर परिसरात नंदीवाले समाजातील एका कुटुंबाला जात पंचायतीने समाजातून बहिष्कृत करून वाळीत टाकल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. समाजात पुन्हा प्रवेश देण्यासाठी तब्बल पाच लाख रुपयांचा दंड मागितल्याचा आरोप संबंधित कुटुंबाने केला असून या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मीनगर येथील नंदा उत्तम पाटील व उत्तम पांडुरंग पाटील हे आपल्या कुटुंबासह अनेक वर्षांपासून नरवाड येथे वास्तव्यास आहेत. ते नंदीवाले समाजाचे असून समाजाच्या मासिक बैठका हिंदमाता चौक येथे होत असतात. या बैठकीस गैरहजर राहिल्याच्या कारणावरून समाजातील काही पंचांनी संबंधित कुटुंबाला समाजातून बाहेर काढून वाळीत टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे.
समाजात पुन्हा सामील करून घेण्यासाठी पाच लाख रुपयांचा दंड भरण्याची अट घालण्यात आली आहे. तसेच समाजातील लोकांनी या कुटुंबाशी बोलू नये, संपर्क ठेवू नये, कोणतीही मदत करू नये, मुलांना मंदिरात प्रवेश देऊ नये आणि सोयरिकही करू नये असा निर्णय बैठकीत घेतल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
तक्रारदार नंदा पाटील या शेतीकामासाठी मजुरीला जात असताना समाजातील काही पंचांनी संबंधित शेतमालकांना धमकी देऊन त्यांना कामावर घेऊ नका असे सांगितल्यामुळे त्यांचे रोजगाराचे साधनही बंद झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच फोनवरून धमक्या देण्यात आल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान, दिनांक २७ फेब्रुवारी २०२६ रोजी काही जणांनी त्यांच्या घरासमोर येऊन धमकी दिल्याचा आरोपही कुटुंबाने केला आहे. तसेच १४ फेब्रुवारी रोजी त्यांची मुले संग्राम आणि राजवीर ही मारुती मंदिरात दर्शनासाठी गेली असता “तुम्हाला वाळीत टाकले आहे, मंदिरात येऊ नका” असे सांगून त्यांना मंदिरातून हाकलून दिल्याची घटना घडल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणात संबंधित कुटुंबाने गावातील सरपंचांकडेही तक्रार केली होती. मात्र कोणतीही कारवाई न झाल्याने त्यांनी अखेर मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. तसेच प्रांत अधिकारी, मिरज यांच्याकडे जात प्रमाणपत्रासाठी दिलेल्या अर्जावरही दबाव आणण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
सदर प्रकार महाराष्ट्र सामाजिक बहिष्कार प्रतिबंध (प्रतिबंध, बंदी व निवारण) अधिनियम २०१७ अंतर्गत गुन्हा असल्याचे सांगत संबंधित पंचांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी तक्रारदारांनी केली आहे. या घटनेमुळे नरवाड परिसरात एकच खळबळ उडाली असून समाजातील काही लोकांनी या प्रकाराचा निषेध व्यक्त केला आहे.
पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन सखोल चौकशी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

No comments: