कागलजवळ ७० लाखांचे कुरिअर साहित्य आगीत भस्मसात.
कागलजवळ ७० लाखांचे कुरिअर साहित्य आगीत भस्मसात.
*********************
शशिकांत कुंभार
**********************
कागल : मुंबईहून बंगळूरुला कुरिअर पार्सल घेऊन जाणाऱ्या एका कंटेनरला रात्री ११ वाजण्याच्या सुमारास कागल सीमा तपासणी नाक्याजवळ भीषण आग लागली. या आगीत कंटेनरमधील सुमारे ७० लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री अकराच्या सुमारास हा कंटेनर कागल येथील सीमा तपासणी नाक्याजवळून जात असताना, एका बस चालकाच्या निदर्शनास कंटेनरला आग लागल्याचे दिसून आले. त्यांनी तत्काळ कंटेनर चालकाला याची माहिती दिली. कंटेनर चालकाने प्रसंगावधान राखत ट्रक रस्त्याच्या कडेला थांबवला आणि पाहणी केली असता, कंटेनरमध्ये मोठ्या प्रमाणात आग लागल्याचे दिसून आले.
आगीचे स्वरूप प्रचंड होते. घटनेची माहिती मिळताच कागल नगरपरिषद आणि कागल पंचतारांकित एमआयडीसी अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, आगीची तीव्रता जास्त असल्याने कंटेनरमधील प्रिंटर, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि काचेचे साहित्य असे सुमारे ७० लाख रुपयांचे मौल्यवान साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र अचानक आग लागल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे.
Comments
Post a Comment