तोतया पत्रकार, पोलिस भरारी पथक वसूल करत होते खंडणी.
तोतया पत्रकार, पोलिस भरारी पथक वसूल करत होते खंडणी.
एक महिलेसह तिघांची टोळी जेरबंद , साकोलीचे दोन आरोपी अटकेत.
चौथा साकोलीचा आरोपी सोनवाने फरार , १३ लाखांचा मुद्देमाल जप्त.
संजीव भांबोरे
भंडारा - पोलीस व पत्रकार असल्याचे भासवून नागरिकांकडून खंडणी वसूल करणाऱ्या बनावट टोळीचा पर्दाफाश करत मूल पोलिसांनी तीन खंडणीखोरांना अटक केली आहे. या आरोपींनी पोलिस आणि पत्रकार असल्याची बतावणी करून नागरिकांना धमकावून पैसे उकळले होते. पोलिसांनी या आरोपींकडून एकूण १३ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून चौथ्या आरोपी फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे.
दिनांक ३ जुलै २०२५ रोजी फिर्यादी सुरेश लक्ष्मण गणमेनवार वय ३६, रा. चिरोली यांच्या घरी एक पांढऱ्या रंगाची अर्टीका कार क्र. एम एच ३४ सीजे ५८२४ येऊन त्यामधील चार जणांनी स्वतःला पोलीस भरारी पथक व पत्रकार चंद्रपूर येथील अधिकारी असल्याचे भासवले. विनापरवाना दारु साठा असल्याच्या कारणावरून कारवाईची धमकी देत त्यांनी फिर्यादीकडून तडजोडीअंती १०,००० रुपये खंडणी उकळली. त्यानंतर याच टोळीने मौजा डोंगरगाव येथील एजाज शेख यांच्या अंडा-आमलेट दुकानात जाऊन ग्राहक दारू पित असल्याचा बनाव करत कारवाईची धमकी दिली. या वेळीही तडजोड करत ५,००० रुपये खंडणी उकळण्यात आली. या प्रकरणावरून दिनांक १३ जुलै २०२५ रोजी मुल पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदवण्यात आला. तपासात मुल पोलिसांनी आरोपी बादल दुर्गाप्रसाद दुबे वय ३६, संगिता बादल दुबे वय २७ दोघेही रा. रेंगेपार, ता. साकोली, जि. भंडारा, अजय विजय उईके वय ३१ रा. गजानन मंदिर रोड, शितला माता मंदिर मागे, चंद्रपूर या तिघांना अटक केली आहे. चौथा आरोपी देवेंद्र चरणदास सोनवाने वय ३० रा. निलज ता. साकोली, जि. भंडारा, ह.मु. भिवापूर वार्ड, चंद्रपूर हा सध्या फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी या आरोपींकडून एक पांढऱ्या रंगाची अर्टीका कार किंमत १२,५०,००० रू, दोन मोबाईल फोन किंमत ४५,००० आणि रोख रक्कम १५,००० रुपये असा १३,१०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. यात पोलीस निरीक्षक विजय राठोड यांच्या नेतृत्वाखाली सपोनि सुबोध वंजारी, पोहवा जमीर खान पठाण, पोहवा भोजराज मुंडरे, नापोअं चिमाजी देवकते, पोअं नरेश कोडापे, पोअं शंकर बोरसरे, पोअं संदीप चुधरी यांनी ही कारवाई केली.
नागरिकांना सर्तक राहण्याचे आवाहन •
कोणीही पोलिस किंवा पत्रकार असल्याची बतावणी करून खंडणी मागत असल्यास अशा बनावट व्यक्तींच्या धमकीला बळी पडू नका. तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये किंवा पोलीस नियंत्रण कक्ष, साकोली ०७१८६ - २३६१३३ अथवा ११२ वर संपर्क साधावा असे आवाहन साकोली पोलिसांनी केले आहे.
Comments
Post a Comment