समाजमाध्यमांमुळे राधानगरीचे वर्षा पर्यटन राज्याच्या नकाशावर; स्थानिक अर्थचक्राला गती अशोक पाटील.
समाजमाध्यमांमुळे राधानगरीचे वर्षा पर्यटन राज्याच्या नकाशावर; स्थानिक अर्थचक्राला गती अशोक पाटील.
--------------------------------
राधानगरी प्रतिनिधी
विजय बकरे
--------------------------------
सगळीकडे समाज माध्यमांबाबत सकारात्मकपेक्षा नकारात्मकच चर्चा अधिक उठावदारपणे होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही समाजमाध्यमे मात्र राधानगरीच्या वर्षा पर्यटनवाढीसाठी महत्त्वपूर्ण ठरली आहेत. परिणामी स्थानिक अर्थचक्राची गती वेगावली आहे.
तालुक्याला हमखास रोजगार उपलब्ध होईल असा कुठलाही मोठा प्रकल्प या तालुक्यात नसल्याने बेरोजगार युवक -युवतींच्या संख्येत भरच पडत आहे. मात्र काही वर्षांपूर्वी तत्कालिन आमदार व सध्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री प्रकाश आबिटकर आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातून राधानगरीचे बारमाही पर्यटन वाढवून त्याद्वारे थोड्याफार प्रमाणात स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती करण्याला बळ देण्यात आले. श्री आबिटकर व मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या सहकार्याने पर्यटनवाढीसाठी स्थानिक विविध समूहांच्या व स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून राधानगरी महोत्सव, फुलपाखरू महोत्सव असे पर्यटन वाढीसाठीचे उपक्रम राबविले गेले आहेत. आता बंदी असलेल्या काजवा महोत्सवांच्या माध्यमातूनही तीन-चार वर्षांपूर्वी राधानगरीच्या पर्यटनाची ओळख विस्तारली गेली होती. येथे पावसाळा वगळता उर्वरित आठ महिने दाजीपूर येथील प्रसिद्ध गवा अभयारण्य व त्यासाठीची जंगल सफारी पर्यटकांमध्ये आकर्षणाचा केंद्रबिंदू ठेवली असून खास पावसाळ्यासाठी
राऊतवाडीसारखा धबधबा हे पर्यटन स्थळ मोठ्या प्रमाणात विकसित झाले आहे. केवळ या दोन पर्यटन स्थळांनी अनेक हातांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. यासह तालुक्यातील हसणे,रामणवाडी,कासारवाडी पडसाळी येथील धबधबेही प्रसिद्ध पर्यटनस्थळे झाली आहेत. इथल्या टपोऱ्या थेंबांच्या पावसाचे पर्यटकांना मोठे आकर्षण असून
राधानगरी येथील लक्ष्मी जलाशय,काळम्मावाडी येथील दूधगंगा आणि धामोड येथील तुळशी जलाशयांच्या बॅक वॉटर परिसरात आनंद लुटण्यासाठी पावसाळ्यासह उन्हाळा व हिवाळ्यातही अनेक पर्यटक रोज हजेरी लावतात. पावसाळ्यात विविध धबधबे पाहणारा पर्यटक राधानगरी येथील लक्ष्मी धरणाच्या स्वयंचलित दरवाज्यातून भोगावती नदीत उसळी घेत पडणाऱ्या फेसाळलेल्या दुधाळ पांढऱ्या शुभ्र पाण्याचे विहंगम दृश्य डोळ्यात साठविण्यासाठी नक्कीच हजेरी लावतो.
कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या सीमेवरील दाजीपूर अभयारण्यातला लागून असलेला फोंडाघाट आणि राधानगरी कसबा तारळे मार्गे गगनबावड्या कडे जाताना पडसाळीच्या डोंगरांवर पावसाळ्यात उतरणारे ढग हे चित्र व तेथील वातावरणही वर्षा पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांचे मन मोहून टाकणारे असते. मांजरखिंड व राधानगरी धरणस्थळ परिसर येथे मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या माध्यमातून उभारलेली पर्यटन शिल्पे आणि धारणस्थळाशेजारीच जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण समिती सभापती अभिजीत तायशेटे यांच्या संकल्पनेतून आकाराला आलेले राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृतिकेंद्र येथे भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्याही लक्षणीय आहे. दरम्यान, रोज एखाद्या पर्यटन स्थळाविषयीची माहिती रील्स आणि छोट्या- मोठ्या व्हिडिओंच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्मवर झळकत असल्याने राधानगरीचे वर्षा पर्यटन आता घरांघरांत पोहोचले आहे. एका अर्थाने येथील पर्यटनाच्या कक्षा राज्यासह राज्याबाहेरही रुंदावल्या आहेत. परिणामी राधानगरीकडे येणाऱ्या अनेक मार्गांवरील विविध व्यवसायांसह खासकरून राधानगरी तालुक्यातील हॉटेल,वाहतूक,स्थानिक कुटुंबांकडून पुरविली जाणारी भोजन आणि निवास व्यवस्था, पर्यटनस्थळी होणारी खाद्य व पेय पदार्थांची विक्री अशा अनेक छोट्या-मोठ्या व्यवसायांना गती मिळाल्याने अर्थचक्रही गतिमान झाले आहे.
.............
चौकट
इथला जलमय निसरडा रस्ता...
जरा 'शिस्ती'त चाल माझ्या दोस्ता !
वर्षा पर्यटन म्हटले की छोटे-मोठे अपघात हे समीकरण जणू ठरलेलेच आहे. पण त्यासाठी विशेषतः युवकांची बेफिकीरी हे मोठे कारण ठरते आहे. पावसाळ्यात इथल्या पर्यटनस्थळांपर्यंत जाणारे रस्ते,मार्ग,वाटा, दगड जलमय होतात आणि चिखल,शेवाळांमुळे निसरडे बनतात. परंतु बेपर्वाई आणि कधी कधी थोडीफार पोटात गेलेली मदिरा यामुळे धुंदीत वर्षा पर्यटन करणारे विशेषतः युवक अपघातग्रस्त होतात. त्यांच्यासाठी शिस्त महत्त्वाची आहे. राधानगरी पोलिस यावर काही प्रमाणात नियंत्रण ठेवण्यात यशस्वी झाले आहेत;परंतु युवा पर्यटकांनी स्वतःच अशी शिस्त पाळली तर वर्षा पर्यटन अजून नक्कीच सुखाचे होईल.
.................
कोट
"आमच्या बायसन नेचर क्लब आणि राधानगरी तालुक्यातील इतर पर्यटन प्रेमी समूहांच्या व व्यक्तिंच्या माध्यमातून राधानगरीचे बारमाही पर्यटन कसे वाढेल यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातात. यासाठी खास ध्वनीचित्रफितीही बनवून घेतल्या असून प्रसंगानुरूप त्यांचा वारंवार प्रसार केला जातो. सोशल मीडिया व अन्य प्रसारमाध्यमे यांच्या माध्यमातून राधानगरीतील पर्यटन स्थळांना प्रसिद्धी मिळत असल्याने येथील पर्यटन वाढले असून काही प्रमाणात हंगामी रोजगारही उपलब्ध झाले आहेत."- सम्राट केरकर (स्थानिक पर्यटन तज्ज्ञ व व्यावसायिक)
..............
फोटो ओळी
राऊतवाडी (ता.राधानगरी) : राज्यासह राज्याबाहेरील पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरलेला येथील प्रसिद्ध धबधबा
......
वरील बातमी पर्यटन विशेष बातमी आहे ती दैनिक सुपर भारतला देऊन सहकार्य करणे आपल्याला फोटो पाठवले आहेत ते पण त्या बातम्या लावून सहकार्य करा
Comments
Post a Comment