कणेरीवाडीजवळ महामार्गावर कंटेनर पलटी; मद्यधुंद चालकामुळे अपघात, वाहतूक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर.
कणेरीवाडीजवळ महामार्गावर कंटेनर पलटी; मद्यधुंद चालकामुळे अपघात, वाहतूक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर.
---------------------------------------
गोकुळ शिरगाव प्रतिनिधी
सलीम शेख
---------------------------------------
पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर कणेरीवाडी परिसरात वैभव हॉटेलजवळ दुपारी तीन वाजता चेन्नईहून मुंबईकडे दुचाकी घेऊन जाणारा ट्रान्स ग्लोबल लॉजिस्टिक्स प्रायव्हेट लिमिटेडचा (MH20 GC 8063) कंटेनर पलटी झाला. चालकाच्या मद्यधुंद अवस्थेमुळे हा अपघात झाल्याचे समोर आले आहे, ज्यामुळे महामार्गावरील वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चालकाला बिअर बार दिसल्यानंतर त्याने अचानक रस्ता वळवण्याचा प्रयत्न केला. याच प्रयत्नात कंटेनरचा तोल जाऊन तो सहापदरीकरणाचे अपूर्ण काम सुरू असलेल्या रस्त्यावर पलटी झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, ही दिलासादायक बाब आहे. मात्र, अपघातानंतरही चालक अशोक हा मद्यधुंद अवस्थेत घटनास्थळीच बसून होता.
या अपघातामुळे मुख्य वाहतुकीस कोणताही अडथळा निर्माण झाला नाही, कारण कंटेनर अर्धवट सुरू असलेल्या सहापदरीकरणाच्या जागेवर पलटी झाला होता. मात्र, आश्चर्य म्हणजे, हा अपघातग्रस्त कंटेनर शनिवार रात्री उशिरापर्यंतही महामार्गावरून हलवण्यात आला नव्हता.
कंपनीकडून या काळात कोणतीही तातडीची उपाययोजना करण्यात आली नाही. सायंकाळी कंपनीचे व्यवस्थापक घटनास्थळी आले आणि वाहन हलवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली, मात्र ती रात्री उशिरापर्यंत पूर्ण झाली नव्हती.
या निष्काळजीपणामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. मद्यधुंद चालक आणि वाहतूक सुरक्षेच्या दृष्टीने दुर्लक्ष करणाऱ्या कंपनीवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
सध्या कागल ते सातारा दरम्यान सहापदरीकरणाचे काम अपूर्ण अवस्थेत सुरू आहे. त्यातच महामार्गालगत बिअर बार आणि दारू दुकाने सर्रासपणे सुरू असल्याने वाहनचालक नशेत गाडी चालवण्याचे प्रकार वाढले आहेत. याचा परिणाम म्हणून अपघातांना निमंत्रण मिळत आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणांनी या गंभीर समस्येवर तातडीने आणि कठोर उपाययोजना करण्याची नितांत गरज आहे.
Comments
Post a Comment