राधानगरीतील दोन जबरी चोऱ्या उघड; ९.५ लाखांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई!
राधानगरीतील दोन जबरी चोऱ्या उघड; ९.५ लाखांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई!
-------------------------------------
शशिकांत कुंभार
--------------------------------------
राधानगरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील वर्षी आणि चालू वर्षी शेतात काम करणाऱ्या वृद्ध महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरीने चोरून नेल्याच्या दोन गंभीर गुन्ह्यांची उकल करण्यात कोल्हापूर स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले आहे. या कारवाईत पोलिसांनी ९० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दोन चिताक आणि एक मोटारसायकल असा एकूण ९ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मा. पोलीस अधीक्षक श्री. योगेशकुमार गुप्ता यांनी जिल्ह्यात वाढत्या जबरी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी आणि घडलेले गुन्हे उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना विशेष सूचना दिल्या होत्या. राधानगरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सावर्डे पाटणकर येथील सोनाबाई मारुती पाटील (वय ६५) आणि चक्रेश्वरवाडी येथील मंगल तुकाराम नरके (वय ६०) या दोन वृद्ध महिलांना मारहाण करून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे चिताक चोरून नेले होते. या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे नसणे आणि चोरट्याने रेनकोट घालून आपली ओळख लपवल्यामुळे हे गुन्हे उघडकीस आणणे पोलिसांसाठी एक आव्हान होते.
पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांच्या सूचनेनुसार, पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमले. या पथकाने समांतर तपास सुरू केला असता, पोलीस अंमलदार संजय कुंभार आणि सागर माने यांना गोपनीय माहिती मिळाली की, राधानगरी येथील जबरी चोऱ्या नामदेव पाटील (रा. चक्रेश्वरवाडी, ता. राधानगरी) याने केल्या आहेत आणि तो सध्या कोल्हापुरातील आयडियल कॉलनीजवळ, लक्षतीर्थ वसाहत येथे स्प्लेंडर मोटरसायकलवरून फिरत आहे.
या माहितीच्या आधारे, पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे आणि त्यांच्या पथकाने आयडियल कॉलनीजवळ सापळा रचून संशयित नामदेव शिवाजी पाटील (वय ३४, रा. चक्रेश्वरवाडी, ता. राधानगरी) याला ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली, परंतु पोलिसांनी अधिक विश्वासात घेऊन सखोल तपास केला असता, त्याने चक्रेश्वरवाडी आणि सावर्डे पाटणकर येथील वृद्ध महिलांच्या गळ्यातील सोन्याचे चिताक मारहाण करून, जबरदस्तीने चोरल्याची कबुली दिली.
आरोपी नामदेव पाटील आणि जप्त केलेला मुद्देमाल पुढील तपासासाठी राधानगरी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहेत.
पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक आण्णासाहेब जाधव आणि मा. अपर पोलीस अधीक्षक बी. धीरजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे, पोलीस अंमलदार संजय कुंभार, सागर माने, संजय देसाई, लखनसिंह पाटील, महेश पाटील, महेश खोत, विजय इंगळे, शुभम संकपाळ, संदीप बेंद्रे, विशाल चौगले, संजय हुंबे, अशोक पोवार, प्रकाश पाटील, अमित सर्जे, सागर चौगले, सुशील पाटील, हंबीरराव अतिग्रे यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली आहे.
Comments
Post a Comment