राधानगरी पोलिसांची मोठी कारवाई: जबरी चोरीतील १००% मुद्देमाल हस्तगत, दोन आरोपी अटकेत.
राधानगरी पोलिसांची मोठी कारवाई: जबरी चोरीतील १००% मुद्देमाल हस्तगत, दोन आरोपी अटकेत.
--------------------------------
राधानगरी प्रतिनिधी
विजय बकरे
--------------------------------
कोल्हापूर : राधानगरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या दोन वेगवेगळ्या जबरी चोरीच्या गुन्ह्यांची उकल करत पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या १००% मुद्देमालाची वसुली करण्यात यश आले आहे.
गुन्हा क्रमांक १:
दिनांक ३१/०७/२०२५ रोजी सायंकाळी ५.३० वाजता आक्काताई तानाजी खोत (वय ६५, रा. चांदेकरवाडी) या चांदेकरवाडी-बाचणी रोडवरून चालत जात असताना, दुचाकीवरून आलेल्या एका अज्ञात इसमाने त्यांच्या गळ्यातील १ तोळ्याचे मणीमंगळसूत्र आणि ५ ग्रॅमचा सोन्याचा गुंड असा एकूण १,३५,०००/- रुपयांचा मुद्देमाल हिसकावून नेला होता. या गुन्ह्याचा तपास पोसई आकाशदीप भोसले करत होते.
गुन्हा क्रमांक २:
१३/०८/२०२५ रोजी दुपारी ०३.०० वाजता रुक्मिणी राऊत (वय ७२, रा. सोन्याची शिरोली) या जोतिलिंग पानशॉपमध्ये बसल्या असताना, दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांपैकी एकाने त्यांच्या गळ्यातील ४२,०००/- रुपये किमतीचे ६ ग्रॅम वजनाचे मणीमंगळसूत्र हिसकावून नेले होते. या गुन्ह्याचा तपास पोसई प्रणाली पवार करत होत्या.
सलग घडलेल्या या घटनांमुळे पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांना या गुन्ह्यांची उकल करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार, पो.नि. गोरे यांनी पोलीस ठाणे स्तरावर एक विशेष पथक नेमले, ज्यात पोहेका कृष्णात खामकर, शेळके आणि किरण पाटील यांचा समावेश होता. या पथकाने चांदेकरवाडी, बाचणी आणि सोन्याची शिरोली परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. फुटेजमधील संशयितांची ओळख पटवण्यासाठी पोहेका खामकर यांनी प्रयत्न केले आणि त्यांना कागल पोलीस ठाण्याचे युवराज पाटील यांनी चोरट्यांची माहिती दिली.
त्यानंतर, राधानगरी पोलीस आणि कागल पोलीस यांनी संयुक्तपणे कारवाई करत गुन्ह्यातील मुख्य आरोपी समीर रमजान मकानदार (वय २३, रा. उमळवाड, ता. शिरोळ) याला उमळवाड फाट्यावरून ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने दोन्ही चोऱ्या त्याच्या दोन साथीदारांच्या मदतीने केल्याची कबुली दिली. त्याच्या साथीदारांपैकी सार्थक नितीन तिवडे (वय १९, रा. उमळवाड) यालाही अटक करण्यात आली आहे, तर दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे.
आरोपी समीर मकानदारला पोसई आकाशदीप भोसले यांच्या ताब्यात दिल्यावर, त्यांनी आरोपीची तीन दिवसांची पोलीस कोठडी घेऊन तपास केला. या तपासणीत पोलिसांनी दोन्ही गुन्ह्यांमधील चोरीला गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला आहे. यात गु.र.नं. २३३/२०२५ मधील १,३५,०००/- रुपयांचा आणि गु.र.नं. २४६/२०२५ मधील ४२,०००/- रुपयांचा मुद्देमाल परत मिळवण्यात आला. यासोबतच गुन्ह्यात वापरलेली ५० हजार रुपये किमतीची स्प्लेंडर मोटारसायकलही जप्त करण्यात आली आहे.
ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अपर पोलीस अधीक्षक बी. धीरजकुमार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी आप्पासो पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष गोरे, पोलीस उपनिरीक्षक आकाशदीप भोसले, प्रणाली पवार, कृष्णात खामकर, शेळके, किरण पाटील, भोपळे, तसेच कागल पोलीस ठाण्याचे युवराज पाटील आणि कुरणे यांनी पार पाडली आहे.
Comments
Post a Comment