कोल्हापुरात बनावट नोटा बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; २.९५ लाखांचा मुद्देमाल जप्त.
कोल्हापुरात बनावट नोटा बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; २.९५ लाखांचा मुद्देमाल जप्त.
----------------------------
कोल्हापूर प्रतिनिधी
शशिकांत कुंभार
----------------------------
कोल्हापूर: कोल्हापूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने बनावट नोटा तयार करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून २,२४,२०० रुपयांच्या बनावट नोटा आणि ७०,७०० रुपयांचे बनावट नोटा तयार करण्याचे साहित्य असा एकूण २,९४,९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांच्या आदेशानुसार, बनावट नोटांच्या वाढत्या प्रकरणांमुळे यावर कारवाई करण्यासाठी एक विशेष पथक तयार करण्यात आले होते. १३ ऑगस्ट, २०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना एका गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, इचलकरंजी येथील नारायण टॉकीज परिसरात एक व्यक्ती बनावट नोटा विकण्यासाठी येणार आहे.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून अनिकेत विजय शिंदे (वय २४, रा. इचलकरंजी) याला ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत काही बनावट नोटा सापडल्या. चौकशीदरम्यान, त्याने कबूल केले की तो आपल्या राहत्या घरात या नोटा छापतो आणि त्याचे आणखी दोन साथीदारही तिथेच आहेत.
पोलिसांनी तात्काळ अनिकेतच्या घरी छापा टाकला असता, घरातून १०० रुपयांच्या २८२ नोटा आणि ५०० रुपयांच्या ३९२ नोटा, तसेच बनावट नोटा बनवण्यासाठी लागणारे प्रिंटर, शाई आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. पोलिसांनी त्याचे साथीदार राज रमेश सनदी (वय १९) आणि सोएब अमजद कलावंत (वय १९) यांनाही अटक केली.
या प्रकरणी इचलकरंजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींनी या नोटा कधीपासून बनवायला सुरुवात केली आणि कोठे विकल्या, याबाबत पुढील तपास सुरू आहे.
No comments: