Header Ads

कोल्हापूर-सांगली महामार्गावर देशी झाडांची लागवड होणार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे आश्वासन.

कोल्हापूर-सांगली महामार्गावर देशी झाडांची लागवड होणार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे आश्वासन.

------------------------------------

कोल्हापूर प्रतिनिधी

संस्कार कुंभार 

------------------------------------

कोल्हापूर: कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील राज्य महामार्गांच्या दुतर्फा वृक्षारोपण करताना गुलमोहरसारख्या विदेशी झाडांऐवजी देशी प्रजातींना प्राधान्य देण्याचं आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलं आहे. या संदर्भात निसर्गमित्रांच्या एका शिष्टमंडळाने सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता  तुषार बुरुड यांची भेट घेऊन चर्चा केली.

सध्या कोल्हापूर-सांगली महामार्गावर सुमारे ६० हजार झाडं लावण्याची योजना असून, त्यापैकी ११ हजार झाडं लावण्यात आली आहेत. मात्र, या झाडांमध्ये गुलमोहर या विदेशी झाडांचं प्रमाण जास्त असल्याबद्दल शिष्टमंडळाने चिंता व्यक्त केली. गुलमोहरसारखी विदेशी झाडं मानवी आरोग्य, स्थानिक जैवविविधता, पर्यावरण आणि हवामानासाठी हानिकारक ठरू शकतात, असं मत शिष्टमंडळाने मांडलं.

यावर अधीक्षक अभियंता 

 बुरुड यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली. निसर्गमित्रांनी कडुलिंब आणि कदंब यांसारख्या देशी झाडांव्यतिरिक्त इतर अनेक स्थानिक प्रजातींची माहिती दिली. स्थानिक झाडं पर्यावरणाशी सुसंगत असून, ती सौंदर्य वाढवतात, औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असतात आणि पक्षी व फुलपाखरांसाठी परागीभवनाला मदत करतात, असं त्यांनी पटवून दिलं.

या चर्चेनंतर, अधीक्षक अभियंता बुरुड यांनी भविष्यात होणाऱ्या वृक्षारोपणात स्थानिक देशी झाडांना प्राधान्य देण्याचं आश्वासन दिलं. विभागाच्या सध्याच्या कार्यप्रणालीमध्ये (SOP) योग्य ते बदल करून हा निर्णय घेण्यात येणार आहे. यावेळी निसर्गमित्रांकडून सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांना उपयुक्त अशा स्थानिक देशी झाडांची यादीही सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आली.

यावेळी सुहास वायंगणकर, अभिजीत वाघमोडे, परितोष उरकुडे, अरुण सावंत आणि दिग्विजय शिर्के यांसारखे निसर्गमित्र उपस्थित होते. या सकारात्मक निर्णयामुळे भविष्यात कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील रस्त्यांच्या दुतर्फा योग्य आणि नैसर्गिकदृष्ट्या अनुकूल देशी झाडं लावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

No comments:

Powered by Blogger.