हातकणंगले येथे बंद घराचे कुलूप तोडून चोरी, ५.९२ लाखांचा ऐवज लंपास.
हातकणंगले येथे बंद घराचे कुलूप तोडून चोरी, ५.९२ लाखांचा ऐवज लंपास.
---------------------------------------------
कोल्हापूर प्रतिनिधी
संस्कार कुंभार
---------------------------------------------
हातकणंगले : हातकणंगले तालुक्यातील तारदाळ येथील मगदूम मळा येथे एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी ५ लाख ९२ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने, रोकड आणि मोबाईल फोन असा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत.
शीतल राजाराम मगदूम (वय ४८, रा. मगदूम मळा, तारदाळ) यांच्या घरी ही घटना घडली. १६ रोजी पहाटेच्या वेळेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरात प्रवेश केला असावा अंदाज आहे. कशाच्यातरी मदतीने घरातील तिजोरीचे लॉक तोडून चोरट्याने १.५० लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आणि ५० हजार रुपयांची रोकड लंपास केली. या चोरीमध्ये सोन्याच्या पाटल्या, अंगठ्या, कानातील झुब्याची फुले आणि सोन्याची चेन यांचा समावेश आहे.
याचवेळी, फिर्यादीच्या पुतण्या, प्रवीण मगदूम यांच्या घरातही चोरी झाली. चोरट्यांनी त्यांच्या घरातून १.५० लाख रुपयांचे सोन्याचे गंठन, ५० हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र, २५ हजार रुपयांचे झुब्याचे फुल आणि १२ हजार रुपयांची रोकड चोरून नेली. याशिवाय, ५ हजार रुपयांचा वनप्लस कंपनीचा ग्रे रंगाचा मोबाईल फोनही चोरीला गेला आहे.
दोन्ही घरांतून मिळून एकूण ५ लाख ९२ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याची तक्रार शीतल मगदूम यांनी पोलिसांकडे केली आहे. यात सुमारे १०.५ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि एक मोबाईल फोन यांचा समावेश आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत.
Comments
Post a Comment