सातवेतील प्राथमिक शाळेची भिंत कोसळली; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात.
सातवेतील प्राथमिक शाळेची भिंत कोसळली; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात.
-------------------------------
सातवे प्रतिनिधी
सुनील पाटील
-------------------------------
(ता. पन्हाळा) – गुरुवारी दुपारच्या सुट्टीच्या वेळी केंद्रीय प्राथमिक मराठी शाळेत इयत्ता पहिलीच्या वर्गातील आतील भिंत अचानक कोसळली. त्यावेळी सर्व विद्यार्थी पटांगणात डबा खाण्यासाठी गेले होते, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.
अचानक झालेल्या मोठ्या आवाजाने विद्यार्थी व शिक्षकवर्ग धास्तावला. विद्यार्थ्यांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली असता, आपल्या वर्गाची भिंत जमिनीवर कोसळलेली पाहून ते भयभीत झाले. मोठमोठे दगड, विटांचे तुकडे पाहून सगळ्यांच्याच अंगावर शहारे आले.
केंद्रीय प्राथमिक मराठी शाळा 1905 साली बांधण्यात आली आहे. सुमारे पंधरा वर्षांपूर्वी काही दुरुस्तीचे काम झाले असले तरी, त्याची गुणवत्ता कितपत टिकली हा प्रश्न उपस्थित होत आहे. घटनेवरून शाळेची इमारत धोकादायक असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पन्हाळा तालुक्यातील 193 जिल्हा परिषद शाळांपैकी सुमारे 80% शाळा जुन्या इमारतीत चालतात. विद्यार्थ्यांच्या जीवितासाठी सर्व अशा शाळांचे स्ट्रक्चरल ऑडिट तातडीने होणे आवश्यक आहे. घटनेची माहिती मिळताच गटविकास अधिकारी सोनाली माडकर आणि शिक्षण विस्तार अधिकारी शिवाजी मानकर यांनी शाळेला भेट देऊन पाहणी केली.घटनेची बातमी कळताच ग्रामस्थ तातडीने शाळेत पोहोचले. भिंत कोसळल्याच्या भीतीने मुले भेदरून बसली होती. ग्रामस्थांनी शाळा प्रशासनाला जाब विचारला.
"जर ती मुले वर्गात असती, तर आज मोठी जीवितहानी झाली असती. दैव बलवत्तर म्हणून चिमुकल्यांचा जीव वाचला," अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
No comments: