अवैध माती उत्खननाचा पर्दाफाश – मंडळ अधिकारी व तलाठ्यांविरोधात चौकशीची मागणी, 15 ऑगस्टपासून आमरण उपोषणाचा इशारा.
अवैध माती उत्खननाचा पर्दाफाश – मंडळ अधिकारी व तलाठ्यांविरोधात चौकशीची मागणी, 15 ऑगस्टपासून आमरण उपोषणाचा इशारा.
------------------------------
शिरोळ प्रतिनिधी
नामदेव भोसले
------------------------------
– शिरोळ तालुक्यातील अर्जुनवाड, शिरटी आणि परिसरातील गट क्रमांक 94, 95, 1080 आणि 132 मध्ये शासन नियमांचे उल्लंघन करून बेकायदेशीर माती उत्खनन करण्यात आल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. संबंधित गावातील तलाठी व मंडळ अधिकारी यांनी संगनमताने आर्थिक फायद्यासाठी खोटे कागदपत्र तयार करून शासनाची फसवणूक केल्याचा ठपका तक्रार अर्जात ठेवण्यात आला आहे.
अर्जुनवाड येथील गट क्रमांक 132 मध्ये, तसेच शिरटी गट क्रमांक 1080 मध्ये शासकीय परवानगी न घेता अथवा परवानगी संपल्यानंतरही उत्खनन सुरू ठेवण्यात आले. हे सर्व प्रकरण स्थानिक तलाठी व शिरोळचे मंडळ अधिकारी अविनाश सूर्यवंशी यांच्या संगनमतातून घडल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
तक्रारदारांनी असा आरोप केला आहे की, सुनावणीदरम्यान खोटी कागदपत्रे सादर करून अपीलीय अधिकाऱ्यांची दिशाभूल करण्यात आली असून, या सर्व प्रकरणात गंभीर आर्थिक अनियमितता आहे.
तक्रार अर्जात म्हटले आहे की, जर दोषींवर तातडीने कारवाई करण्यात आली नाही, तर 15 ऑगस्ट 2025 पासून आमरण उपोषण करण्यात येईल. यासंदर्भातील लेखी तक्रार व पुरावे प्रशासनाकडे सादर करण्यात आले आहेत.
प्रशासनाला या प्रकरणाची गंभीर दखल घेण्याचे आवाहन करत, सदर गट नंबरमध्ये सद्यस्थितीत सुरू असलेले तसेच मुदत संपल्यानंतरही सुरू असलेल्या उत्खनन स्थळांची पंचनामा तपासणी करून, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 48 (7) (8) अंतर्गत दोषींवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये संतापाची लाट असून, योग्य कारवाई न झाल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशाराही तक्रारदारांनी दिला आहे.
Comments
Post a Comment