गांधीनगरात अवैध धंद्यांचा बाजारपेठेप्रमाणे विस्तार गुटखा, दारू, गांजा, मटका – चोरुन सुरू. पोलिसांची मात्र डोळे झाक?.
गांधीनगरात अवैध धंद्यांचा बाजारपेठेप्रमाणे विस्तार गुटखा, दारू, गांजा, मटका – चोरुन सुरू. पोलिसांची मात्र डोळे झाक?.
--------------------------------
गांधीनगर प्रतिनिधी
शशिकांत कुंभार
--------------------------------
गांधीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुटखा, गोवा बनावटीची दारू, गावठी हातभट्टी, गांजा व (मटका डबल चिट्टी मोबाइलवर व्हाट्सअप च्या माध्यमातून)अशा अवैध धंद्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून चोरुन सुरू आहेत. धंदेवाल्यांना पोलिसांची मूक संमती मिळाल्याची चर्चा जोर धरत आहे.
४०० पानपट्ट्या गुटख्याने गजबजल्या
गांधीनगर, वसगडे, चव्हाणवाडी, सरनोबतवाडी, वळीवडे, चिंचवाड, उचगाव या भागात तब्बल ४०० पानपट्ट्या असून त्यावर सुगंधी तंबाखू आणि गुटखा सहज उपलब्ध आहे. चिचवाड रोडलगतच्या रेल्वे रुळांजवळ तरुण गांजा ओढताना दिसतात. तावडे हॉटेल पोलिस चौकीच्या मागेच असलेल्या पानटपरी वर गुटखा व प्लास्टिक ग्लासांचा व्यापार खुलेआम सुरू आहे.
छोट्या कारवाया – मोठ्या मुभा
नवीन पदभार घेतल्यानंतर काही पोलिसांनी छोटेसे गुटखा पाउच वा थोडीशी दारू पकडून कारवाईचे नाटक करतात. मात्र, काही दिवसांनी हेच धंदेवाल्यांना पुन्हा मोकळे रान देण्यात आले. त्यामुळे “पोलिसांची NOC नसती तर इतके धंदे चोरुन कसे चालले असते?” असा सवाल नागरिक करत आहेत.
तरुणाईच्या भविष्यावर गदा
पूर्वी लहान व्यवसाय उभारणारे तरुण आता “कमी गुंतवणूक – जास्त नफा” या मोहात जुगार, मटका, दारू, गांज्याकडे वळत आहेत. अनेक जण नशेच्या आहारी जाऊन कर्जबाजारी होत आहेत. कित्येक तरुण आकडे मोडीत रमून सट्ट्याच्या आहारी गेले आहेत. एवढेच नव्हे तर काही शासकीय सेवकही या नादाला लागल्याचे निदर्शनास आले आहे.
कुटुंब उद्ध्वस्त – नागरिक संतप्त
अवैध धंद्यांच्या विळख्यात अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली असून नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. हातभट्टी, जुगार, सट्टा चोरुन चालू असून पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप होत आहे.
नागरिकांची मागणी
“गांधीनगरातील अवैध धंदे केवळ धंदेवाल्यांचे नाहीत तर त्यांना पाठबळ देणाऱ्यांचेही आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्वतः लक्ष घालून या साखळीचा बंदोबस्त करावा,” अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
Comments
Post a Comment