पूर्ववैमन्यासतून गांधीनगरात वृध्दावर हल्ला. तिघेजण जखमी.
पूर्ववैमन्यासतून गांधीनगरात वृध्दावर हल्ला. तिघेजण जखमी.
गांधीनगर, ता.25ः गांधीनगर (ता. करवीर) येथे काल रात्री गणेशोत्सवाचा मंडप घालत असताना पूर्ववैमनस्यातून धारदार शस्त्राने वार केल्याने विठ्ठल कृष्णा पवार (वय 65 वर्षे, रा. वळिवडे रोड, गांधीनगर) हे गंभीर जखमी झाले. तर ऋषिकेश सुनिल पवार (वय 21 वर्षे) आणि अलका ज्ञानू पवार (वय 60 वर्षे) हे जखमी झाले.
विठ्ठल कृष्णा पवार
याबाबत गणेश उर्फ प्रथमेश आनंदा कांबळे (वय 26 वर्षे), अनिकेत शिवाजी कांबळे (वय 25 वर्षे), राजू रावसाहेब कांबळे (वय 45 वर्षे), बजरंग रावसाहेब कांबळे (वय 42 वर्षे), सचिन आनंदा कांबळे (वय 42 वर्षे, सर्व रा. राधास्वामी मंदिर, वळिवडे रोड, गांधीनगर) यांच्याविरोधात निलेश ज्ञानू पवार (वय 29 वर्षे, रा. राधास्वामी मंदिर, वळिवडे रोड, गांधीनगर) यांनी फिर्याद दिली.
याबाबतची माहिती अशी की, फिर्यादी आणि संशयित आरोपी हे एकाच गल्लीत राहतात. फिर्यादी निलेश पवार यांचा प्रेमविवाह झाला असून तेव्हापासून त्यांचा वाद सुरु आहे. फिर्यादी आणि आरोपी हे गल्लीतीलच वेगवेगळ्या मंडळात कार्यरत आहेत. काल रात्री गणेशोत्सवाचा मंडप घालत असताना गणेश उर्फ प्रथमेश कांबळे याने फिर्यादी यांचे चुलतभाऊ
ऋषिकेश आणि चुलते विठ्ठल यांना धमकावून शिवीगाळ सुरु करत ऋषिकेश याचे पाठीत लाकडी ओंडका घातला. यावेळी फिर्यादी हे भांडण सोडविणेस गेले असता राजू आणि बजरंग यांनी फिर्यादीस हाताने मारहाण केली. त्याचवेळी सचिन कांबळे याने विठ्ठल पवार यांना धारदार शस्त्राने गळ्यास आणि इतर ठिकाणी वार करुन गंभीर जखमी केले. फिर्यादी यांची आई अलका या भांडण सोडविण्यासाठी गेल्या असता त्यांच्याही हाताला जखम झाली. त्यानंतर स्थानिक लोकांनी विठ्ठल पवार यांना वसाहत रुग्णालय येथे नेले. तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करुन त्यांना सीपीआर रुग्णालयात पुढील उपचारासाठी नेले. विठ्ठल पवार यांची प्रकृती चिंताजनक असून पोलीसांनी सचिन आनंदा कांबळे, गणेश उर्फ प्रथमेश आनंदा कांबळे, अनिकेत शिवाजी कांबळे, राजू रावसाहेब कांबळे, बजरंग रावसाहेब कांबळे यांना अटक केली आहे. पोलीसांनी दोन्ही मंडळांच्या कार्यकर्त्यांना मंडप काढण्यास भाग पाडले आहे. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे करत आहेत.
-------------------
चौकट - विठ्ठल पवार हे गांधीनगर येथे झालेल्या लोकनियुक्त सरपंचपदाचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार होते.
-------------------
Comments
Post a Comment