मजुरांचा तुटवडा आणि वाढता खर्च : शेतकऱ्यांची कोंडी.
मजुरांचा तुटवडा आणि वाढता खर्च : शेतकऱ्यांची कोंडी.
----------------------------------
बाजार भोगाव
सुदर्शन पाटील
----------------------------------
पन्हाळा तालुक्यातील शेतकरी सध्या खरीप हंगामातील कामांमध्ये व्यस्त आहेत. गावोगावी भात भांगलण, भातावर कीटकनाशक फवारणी, ऊसाचा पाला पाडणे अशी शेतीची विविध कामे वेगाने सुरू झाली आहेत. मात्र, यंदा या कामांना मोठ्या प्रमाणावर मजुरांचा तुटवडा जाणवत असून, शेतकऱ्यांची चांगलीच गोची झाली आहे.
सरकारकडून मिळणाऱ्या विविध योजनांचा फायदा घेत अनेक मजूर शेतीकामांपासून दूर गेले आहेत. पिवळ्या व केसरी रेशनकार्डधारकांना मिळणाऱ्या मोफत वैद्यकीय सेवा, दरमहा मोफत रेशन, ‘लाडकी बहिण’ योजनेचा हप्ता यामुळे कामाची गरज न वाटल्याने अनेकजण शेतीकामासाठी उपलब्ध राहत नाहीत. परिणामी, मजूर मिळत नसल्याने शेतीचे काम वेळेत पूर्ण करणे कठीण झाले आहे.
याचा थेट परिणाम मजुरीच्या दरांवर झाला असून, मजूर मिळणे अवघड तर झालेच आहे पण मिळणाऱ्या मजुरीचे दर गगनाला भिडले आहेत. त्यातच खतांच्या वाढत्या दरांनी शेतकऱ्यांच्या खिशाला कात्री लागली आहे.
बनावट बियाण्यांनी डोकेदुखी
शेतीचा आणखी एक मोठा अडथळा म्हणजे नकली बियाण्यांचा प्रसार. भात, मका, सोयाबीन यांसारख्या पिकांसाठी बाजारातून घेतलेली काही बियाणे नकली निघत आहेत. यामुळे उगमच न होणे, पुन्हा लागवड करण्याचा खर्च अशा अडचणी उभ्या राहतात. अनेकदा नुकसान भरपाई वेळेवर मिळत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांवर दुहेरी आर्थिक ताण निर्माण होतो.
खर्च वाढतोय, उत्पन्न घटतेय
खत, बियाणे, औषधे, पाणी, मशागत, मजुरी यासारख्या खर्चात सातत्याने वाढ होत असताना, हवामानातील बदल व रोगराईमुळे उत्पादन मात्र घटत आहे. परिणामी नफा तर दूरच, उलट कर्जबाजारीपणाचा विळखा वाढत चालला आहे.
कोट
> “शासनाने सर्वसामान्य लोकांसाठी जसे लाभधर्मक योजना आणल्या, तसेच शेतकऱ्यांनाही कमी दरात खते-बियाणे उपलब्ध करून द्यावीत. शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित किमान हमीभाव मिळणे अत्यावश्यक आहे.”
फोटोओळ : पाटपन्हाळा येथे शेतात भात भांगलण करताना महिलावर्ग
Comments
Post a Comment