कर्मवीर मल्टीस्टेट जयसिंगपूर संस्थेकडून सभासदांना १५% लाभांश चेअरमन – अरविंद मजलेकर.
कर्मवीर मल्टीस्टेट जयसिंगपूर संस्थेकडून सभासदांना १५% लाभांश चेअरमन – अरविंद मजलेकर.
------------------------------------
नामदेव भोसले
------------------------------------
कर्मवीर भाऊराव पाटील मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटीची ३८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सहकार महर्षी स्व. शामराव पाटील यड्रावकर नाट्यगृह, जयसिंगपूर येथे उत्साहात पार पडली. सभेच्या प्रारंभी व्हा. चेअरमन प्रा. आप्पा भगाटे यांनी स्वागत केले, तर श्री. सुभाष मगदूम यांनी दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण केली. संस्थेचे सीईओ श्री. चंद्रकांत धुळासावंत यांनी सभेची नोटीस व मागील इतिवृत्त वाचले.
चेअरमन श्री. अरविंद मजलेकर यांनी २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा अहवाल सादर करताना संस्थेच्या उत्तुंग यशाची माहिती दिली. प्रत्यक्ष व्याज वसूलीतून संस्थेला तब्बल ११ कोटींचा निव्वळ नफा झाला असून सभासदांसाठी १५% इतका उच्चतम लाभांश जाहीर करण्यात आला. अहवाल काळात ठेवीत ९४ कोटींची भर पडून ठेवींची रक्कम ६८२ कोटींवर पोहोचली, तर कर्जाची रक्कम ४५० कोटी इतकी झाली आहे. संस्थेचा स्वनिधी विभागणीनंतर १०० कोटींवर पोहोचला असून भांडवल पर्याप्तता प्रमाण १६.७४% इतके आहे.
संस्थेला फेडरेशन ऑफ मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचा “सर्वोत्कृष्ट संस्था पुरस्कार” सलग तिसऱ्यांदा मिळाला आहे. सामाजिक बांधिलकी जपत ‘रयतमाऊली लक्ष्मीबाई पाटील मंगळसूत्र कर्ज योजना’ सुरु करण्यात आली आहे. या योजनेत ५ ग्रॅमपर्यंत मंगळसूत्र खरेदीसाठी केवळ ८% व्याजदराने कर्ज दिले जाणार असून संस्थेला यात कोणताही आर्थिक लाभ न घेता ही योजना महिलांसाठी राबवण्यात आली आहे. यासाठी चंदूकाका सराफ यांनी मजुरीशिवाय मंगळसूत्र देण्याची तयारी दर्शवली आहे.
याशिवाय वीराचार्य आधार योजना, रयतमाऊली सुकन्या सन्मान योजना, ज्येष्ठाधार योजना व अंत्यविधी योजना अशा योजनांतून सभासदांना तब्बल २० लाखांची मदत करण्यात आली आहे. सामाजिक कार्याचा भाग म्हणून वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे यांच्या नावाने रुकडी व कुरुंदवाड येथे विभागीय केंद्र सुरू केले असून तेथील सेवा सर्वांसाठी मोफत उपलब्ध आहे.
या सभेत संचालक मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते. संस्थेच्या कामकाजाबाबत सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना संचालक श्री. सागर चौगुले यांनी समाधानकारक उत्तरे दिली. विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी संस्थेच्या संचालिका सौ. उज्वला मगदूम, सौ. उर्मिला उपाध्ये, सर्व शाखा सल्लागार, वीर सेवा दल, वीराचार्य पतसंस्थेचे पदाधिकारी तसेच लेखापरीक्षक सीए प्रणील पाटील उपस्थित होते. यावर्षी प्रथमच संस्थेची सभा युट्यूबद्वारे थेट प्रक्षेपित करण्यात आली, ज्यामुळे सभासदांचा मोठा प्रतिसाद लाभला.
No comments: