सार्वजनिक गणपती विसर्जनासाठी महापालिकेची यंत्रणा सज्ज.
सार्वजनिक गणपती विसर्जनासाठी महापालिकेची यंत्रणा सज्ज.
------------------------------------
रजनी कुंभार.
------------------------------------
कोल्हापूर, ता. 04 : अनंत चतुर्दशीच्या दिवशी होणाऱ्या सार्वजनिक गणपती विसर्जनाकरिता महापालिकेची संपूर्ण यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. विसर्जन मार्गावरील धोकादायक इमारतीभोवती बॅरेकेट्स उभारून सूचना फलक लावण्यात येणार असून, नागरिकांनी या इमारतींमध्ये प्रवेश न करण्याचे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
पावसाने विश्रांती दिल्याने विसर्जन मार्गावरील खड्ड्यांवर युद्धपातळीवर डांबरी पॅचवर्क करण्यात येत आहे. इराणी खण व विसर्जन मार्गावर सीसीटीव्ही बसविण्यात येत असून पोलिस प्रशासनाने निश्चित केलेल्या मार्गावर बॅरिकेट्स, वॉच टॉवर आणि आवश्यक त्या ठिकाणी लाईटची व्यवस्था करण्यात आली आहे. मिरवणूक मार्गावर झाडांच्या फांद्या छाटण्यात आल्या असून मार्गावरील अडथळे व अतिक्रमणे दूर करण्यात येत आहे.
सार्वजनिक गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी इराणी खणीवर चार क्रेन व १० फ्लोटिंग तराफ्यांची सोय करण्यात आली आहे. विसर्जनाच्या कामकाजाकरिता पवडी, आरोग्य, उद्यान व इतर विभागांचे सुमारे ३ हजार कर्मचारी नियुक्त करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर १०० टेंपो, ४१५ हमाल, ५ जेसीबी, ७ डंपर, ४ पाणी टँकर, २ बूम, ६ ॲम्बुलन्स व इतर यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
आरोग्य विभागाकडून विसर्जन मार्ग व स्थळांवर साफसफाईसाठी आरोग्य कर्मचारी व वैद्यकीय पथके नेमण्यात आलेली आहेत. अर्पण केलेल्या गणेशमूर्ती व निर्माल्य इराणी खणीमध्ये पोहोचविण्यासाठी स्वतंत्र वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांच्या मदतीसाठी दूरध्वनी क्रमांक ०२३१-२५४५४७३, 2542601 उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीतील मंडळांना महापालिकेच्यावतीने श्रीफळ अर्पण
शनिवार, दि.६ सप्टेंबर २०२५ रोजी अनंत चतुर्दशी निमित्त विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या सार्वजनिक संस्था, तरुण मंडळे व तालीम संस्थांच्या अध्यक्षांचे महापालिकेच्यावतीने स्वागत करण्यात येणार आहे. तसेच पर्यायी विसर्जन मार्ग हॉकी स्टेडियम येथेही स्वागत कक्ष उभारण्यात येत आहे. या दोन्ही ठिकाणी प्रशासनाच्या वतीने श्रीफळ, पान, सुपारी व एक रोप देण्यात येणार आहे.
अग्निशमन विभागामार्फत विसर्जन ठिकाणी अग्निशमन दलाचे पथक व सुरक्षा गार्ड ठेवण्यात येणार असून सर्व मंडळांनी पर्यावरणपूरक गणेशमूर्तींचे विसर्जन इराणी खणामध्ये करण्याचे आवाहन महापालिका प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी केले आहे.
No comments: