कळे पोलिस ठाणे हद्दीत सामाजिक उपक्रमांसह पारंपरिक रंगात गणेशोत्सव.
कळे पोलिस ठाणे हद्दीत सामाजिक उपक्रमांसह पारंपरिक रंगात गणेशोत्सव.
-------------------------------
सुदर्शन पाटील
-------------------------------
कळे पोलिस ठाणे हद्दीतील गणेशोत्सवाला यंदा सामाजिक व पारंपरिक रंग चढला आहे. ठाण्याअंतर्गत येणाऱ्या ७३ गावांपैकी तब्बल २५ गावांनी ‘एक गाव,एक गणपती’ या उपक्रमाला प्रतिसाद दिला आहे. उर्वरित ४८ गावांत १२० सार्वजनिक मंडळांच्या माध्यमातून गणेशत्सव साजरा होत असून,त्यापैकी १८ मंडळांनी साऊंड सिस्टीमविरहित गणेशोत्सवाची निवड केली आहे.
पोलिस प्रशासनाच्या डॉल्बीमुक्त उत्सवाच्या आवाहनाला ग्रामीण भागातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून मंडळांनी कर्णकर्कश आवाज टाळून आकर्षक रोषणाई,रक्तदान शिबिर,झिम्मा फुगडी स्पर्धा सह भक्तिगीतांचा निनाद आणि महाप्रसादाचे आयोजन करून उत्सवाला सोज्वळ स्वरूप दिले आहे. जिलेबी,लाडू,पुरी-बासुंदी अशा गावजेवणाच्या आयोजनामुळे भक्तांच्या आनंदात भर पडली आहे.
सहाय्यक पोलिस निरीक्षक रणजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस व होमगार्डचे विशेष पथक दररोज गावागावांत भेटी देत असून मंडळांच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन व अभिनंदन करत आहे. गणेशमंडळांनी राबवलेले स्वच्छता, वृक्षारोपण, आरोग्य तपासणी शिबिरे अशा सामाजिक उपक्रमांचे स्वागत होत आहे. ग्रामीण भागातील गणेशोत्सव पारंपरिक मूल्ये, सामाजिक जबाबदारी आणि भक्तिमय वातावरण यांचा सुंदर संगम साधत असल्याने हा उपक्रम कौतुकास्पद ठरत आहे.
कोट १
गणेश विसर्जन मिरवणूक वेळेवर सुरू करून रात्री दहा पूर्ण पारंपरिक वाद्याच्या गजरात काढावी असे आवाहन कळे पोलिस ठाण्याचे सहाय्यक सपोनि रणजीत पाटील यांनी केले आहे.
फोटोओळ - बाजारभोगाव येथील बछडा ग्रुपच्या वतीने आयोजित केलेल्या महाप्रसादाचा लाभ घेताना भाविक
Comments
Post a Comment