शिरोळ तालुक्यात शालेय पोषण आहार योजनेत त्रुटी, पालकांत नाराजी
शिरोळ तालुक्यात शालेय पोषण आहार योजनेत त्रुटी, पालकांत नाराजी.
**********************
जयसिंगपूर : /नामदेव भोसले
***********************
इ. १ ली ते ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या पोषण आहार योजनेत मोठ्या प्रमाणावर त्रुटी आणि अनियमितता असल्याचे उघड झाले आहे. विद्यार्थ्यांचे पोषण आणि आरोग्य लक्षात घेऊन सुरू करण्यात आलेली ही योजना असली तरी प्रत्यक्ष अंमलबजावणीत अनेक अडचणी निर्माण होत असून पालक व नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
पालकांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या आहाराचे प्रमाण अपुरे असून डाळ, भाज्या यांसारख्या पदार्थांचा दर्जा निकृष्ट आणि अस्वच्छ असतो. शासनाने ठरवून दिलेल्या मेनूप्रमाणे आहार न देता एकसारखा व अपुरा आहार दिला जातो. काही दिवस तर आहारच मिळत नाही, अशीही तक्रार पालकांनी केली आहे. शाळेत चव-चाचणी समिती असली तरी तिचे पालन व्यवस्थित होत नाही, त्यामुळे आहाराच्या गुणवत्तेवर कोणतेही नियंत्रण राहिले नाही.
या अनियमिततेमुळे विद्यार्थ्यांमध्ये अशक्तपणा, थकवा, आजारपण यांसारख्या समस्या निर्माण होत असल्याचा पालकांचा आरोप आहे. “आमच्या मुलांच्या आरोग्यावर याचा वाईट परिणाम होत असून तातडीने तपासणी करून दोषींवर कारवाई व्हावी,” अशी मागणी पालकांनी केली आहे.
स्थानिक प्रशासनाने नागरिकांच्या तक्रारी गांभीर्याने घेत लवकरच चौकशी सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. योजनेची गुणवत्ता तपासून योग्य सुधारणा करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली असून दोष आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्याची तयारी प्रशासनाने दर्शविली आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
No comments: