मिनी बस खाली सापडुन प्रणवचा दुर्दैवी मृत्यू! कळे येथे भीषण अपघात
मिनी बस खाली सापडुन प्रणवचा दुर्दैवी मृत्यू! कळे येथे भीषण अपघात.
------------------------------------कळे :- येथे मिनी बस आणि दुचाकीच्या झालेल्या भीषण अपघातात सुळे (ता. पन्हाळा) येथील प्रणव सर्जेराव पाटील (वय १९) या युवकाचा मृत्यू झाला. चाकाखाली पाय अडकलेल्या प्रणवला बाहेर काढण्यासाठी मिनी बस मागे घ्यावी, असे लोकांनी चालकाला सांगितले. मात्र, चालकाने घाई-गोंधळात गाडी पुढेच रेटल्याने प्रणवचा मृत्यू झाला. कळे येथे सकाळी बाराच्या सुमारास मंगळवारी ही घटना घडली. प्रणव व त्याचा नातेवाईक (नाव समजू शकले नाही) हे दोघे दिवाळीची कपडे खरेदी करण्यासाठी दुचाकीवरून गोठे-परखंदळेमार्गे कळे येथे येत होते. कोल्हापूर-गगनबावडा मार्गावरील आंबेडकर कमानीजवळ ते पोहोचले असता, समोरून येणारी मिनी बस (एम.एच.०९ जी.जे. ९५९०) चालक विजय गजानन कोळेकर (रा.कळे) याने अचानक उजव्या बाजूला वळवली. दुचाकीस्वाराने वाहन नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला; मात्र मागे बसलेला प्रणव मिनी बसच्या मागील चाकाखाली गेला. पाय अडकल्याने लोकांनी चालकाला गाडी मागे घ्यावी असे सांगितले, पण चालकाने चुकीने गाडी पुढेच चालवली आणि चाक प्रणवच्या अंगावरून गेले. घटनेनंतर नागरिकांनी चालकाला जाब विचारला असता, “मी रिव्हर्स गिअर टाकायला गेलो, पण गाडी पुढेच गेली,” असे तो म्हणाला. प्रणवला नागरिकांनी तात्काळ त्या मिनी बसमधून कोल्हापूरकडे रवाना केले. पण बालिंगा परिसरात पोहोचताच त्याला रक्ताची उलटी झाली आणि तो मृत अवस्थेत कोल्हापूरला पोहोचला. त्याच्या पश्चात आई-वडील, बहीण, आजी-आजोबा, चुलता-चुलती असा परिवार आहे.

No comments: