एस. जे. फाउंडेशन तर्फे आगळीवेगळी भाऊबीज.वारांगनांसोबत दिवाळीचा आनंद वाटून संवेदनशीलतेचा संदेश.
-------------------------------
कोल्हापूर प्रतिनिधी
संस्कार कुंभार
-------------------------------
समाजातील दुर्लक्षित घटकांना सन्मान देत एस. जे. फाउंडेशन, लाईन बाजार कसबा बावडा यांनी यावर्षीची भाऊबीज एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरी केली. संस्थेने शहरातील वारांगनांसोबत भाऊबीज साजरी करत त्यांना एक महिन्याचे राशन किट आणि साडी भेट देऊन सन्मानित केले.
हा उपक्रम पद्मा पथक हॉल, लाईन बाजार येथे मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सौ. गीता हसुरकर, सामाजिक कार्यकर्त्या तसेच प्रधान सचिव, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, कोल्हापूर होत्या. त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “एस. जे. फाउंडेशनचा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. समाजातील वंचित घटकांसाठी संवेदनशीलतेचा हा आदर्श आहे. प्रत्येकाने स्वतःच्या तसेच समाजाच्या आरोग्याची काळजी घ्यावी,” असे आवाहन त्यांनी केले.
वारंगना संघटनेच्या अध्यक्षा शारदा यादव यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, “आम्ही आमच्या इच्छेने या व्यवसायात नाही आलो; आयुष्यातील कटू प्रसंगांमुळे आलो आहोत. एस. जे. फाउंडेशनने आम्हाला सन्मान दिला, याबद्दल आम्ही मनापासून आभारी आहोत.”
एस. जे. फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप जाधव म्हणाले की, “समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून हा उपक्रम राबवला आहे. दुर्लक्षित घटकांपर्यंत मदतीचा हात पोहोचवणे हीच आमची खरी दिवाळी आहे,” असे ते म्हणाले.
या वेळी आजिज शेख, मदन तोरस्कर, राहुल भोसले, अर्जुन जाधव, गोपी शेख, शुभम जाधव, संग्राम जाधव, पिंटू दळवी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व वारांगनांनी आणि उपस्थित पाहुण्यांनी एकत्र भाऊबीज साजरी करत मानवतेचा, प्रेमाचा आणि समानतेचा संदेश दिला.

No comments: