इचलकरंजीतील खुनाचा उलगडा – अवघ्या आठ तासांत चौघे आरोपी गजाआड! स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कारवाई
इचलकरंजीतील खुनाचा उलगडा – अवघ्या आठ तासांत चौघे आरोपी गजाआड!
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कारवाई
जयसिंगपूर/प्रतिनिधी: नामदेव भोसले
इचलकरंजी परिसरात झालेल्या थरारक खुनाच्या गुन्ह्यातील चौघा आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (L.C.B.) पथकाने अवघ्या आठ तासांच्या आत अटक करून पोलिसांनी कौतुकास्पद कामगिरी बजावली आहे.
दिनांक २८ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री सुमारास इंदिरा हौसिंग सोसायटी, कबनूर येथील रहिवासी अभिनंदन जयपाल कोल्हापूरे (वय ४४) याचा वैशाली हॉटेलमधील वादातून निर्दयीपणे खून करण्यात आला होता. या प्रकरणी फिर्यादी डॉ. अभिषेक कोल्हापूरे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी तातडीने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना आरोपी शोध मोहीम सुरू करण्याचे आदेश दिले. कळमकर यांनी पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या सहकार्याने तातडीने पथक तयार करून तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपींचा शोध हाती घेतला.
गुप्त माहितीच्या आधारे पथकाने चौंडेश्वरी फाटा, चिपरी (ता. शिरोळ) येथे सापळा रचून मुख्य आरोपी पंकज संजय चव्हाण (वय २७) याला अटक केली. त्याच्यासह रोहित जगन्नाथ कोळेकर (वय २४, कागल), विशाल राजू लोंढे (वय ३१, इचलकरंजी) आणि आदित्य संजय पवार (वय २१, इचलकरंजी) यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले.
चौकशीत आरोपींनी वैशाली हॉटेलमधील वादाच्या रागातून अभिनंदन कोल्हापूरे याचे घरातून अपहरण करून त्याच्या डोक्यात सिमेंटच्या पाईपने वार करून खून केल्याची कबुली दिली आहे.
या कारवाईत पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, उपनिरीक्षक शेष मोरे, अतिष म्हेत्रे, महेश खोत, महेश पाटील, अनिल जाधव, सागर चौगले आणि सायबर पोलिस ठाण्याचे सुरेश राठोड यांनी सहभाग घेतला.
गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड (शिवाजीनगर पोलीस ठाणे) यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


No comments: