नागावच्या सुपुत्राला वीरमरण, शासकीय इतमामात अखेरचा निरोप.
नागावच्या सुपुत्राला वीरमरण, शासकीय इतमामात अखेरचा निरोप.
---------------------------
सलीम शेख
----------------------------
कोल्हापूर नागाव : कोल्हापूर जिल्ह्याच्या करवीर तालुक्यातील नागाव गावचे सुपुत्र, भारतीय सैन्य दलातील शिपाई विजय विलास कराडे यांना कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले. चंदी मंदिर येथे त्यांना वीरमरण आले असून, मंगळवारी (दिनांक ९ सप्टेंबर २०२५) त्यांचे पार्थिव मूळगावी नागावात आणण्यात आले. या घटनेमुळे नागाव गावावर शोककळा पसरली असून, संपूर्ण गावासाठी हा एक मोठा धक्का आहे.
विजय कराडे यांच्या पार्थिवावर नागाव येथील शाळेच्या मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांना मानवंदना देण्यात आली. या दुःखद प्रसंगात सर्व आजी-माजी सैनिक, ग्रामस्थ, विविध राजकीय पक्षांचे नेते आणि अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या डोळ्यांत अश्रू तरळले होते.
आजी-माजी सैनिक वेल्फेअर असोसिएशन कोल्हापूरने आपल्या शोककुल भावना व्यक्त करत म्हटले की, “या दुःखद प्रसंगात आम्ही सर्व आजी-माजी सैनिक त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. शिपाई विजय कराडे यांच्या आत्म्यास शांती लाभो आणि त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.”
विजय कराडे यांनी देशासाठी केलेल्या अतुलनीय सेवेबद्दल संपूर्ण गावाला त्यांचा अभिमान आहे. त्यांच्या अचानक जाण्याने देशाचे मोठे नुकसान झाले आहे, अशा भावना यावेळी अनेकांनी व्यक्त केल्या. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करत असताना अनेकांनी ‘भारत माता की जय’ आणि ‘वीर जवान अमर रहे’ अशा घोषणा दिल्या. या वीरास अखेरचा निरोप देताना प्रत्येकाचे डोळे पाणावले होते. त्यांच्या शौर्याला आणि बलिदानाला सलाम!
Comments
Post a Comment