सांस्कृतिक हॉलमुळे शिकलगार समाजाला मिळणार हक्काचे व्यासपीठ : संजय पाटील यड्रावकर.

 सांस्कृतिक हॉलमुळे शिकलगार समाजाला मिळणार हक्काचे व्यासपीठ : संजय पाटील यड्रावकर.

 ----------------------------

 नामदेव भोसले

----------------------------

गेल्या अनेक वर्षांपासून कुरुंदवाड शहरात वास्तव्यास असलेला शिकलगार समाज हा आर्थिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात मागे पडलेला होता. समाजाला स्वतःचे स्वतंत्र व्यासपीठ नसल्याने सार्वजनिक कार्यक्रम घेण्यास मोठ्या अडचणी येत होत्या. ही अडचण लक्षात घेऊन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी नगरपालिकेच्या माध्यमातून समाजाला जागेची उपलब्धता करून देऊन ३५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याने सांस्कृतिक हॉलची उभारणी सुरू झाली आहे. या हॉलच्या माध्यमातून समाजाला आपली कला, संस्कृती, विचार आणि परंपरा जोपासण्यासाठी एक भक्कम मंच उपलब्ध होणार आहे. निश्चितच या सांस्कृतिक हॉलमुळे शिकलगार समाज विकासात्मक दिशेने मोठे पाऊल टाकेल आणि समाजाची प्रगती गतीने होईल, असे प्रतिपादन जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी केले.

कुरुंदवाड शहरातील शिकलगार वसाहतीत सांस्कृतिक हॉल स्लॅबच्या शुभारंभ सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. या वेळी समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना संजय पाटील यड्रावकर पुढे म्हणाले, शिकलगार समाजाने आजवर अनेक अडचणींवर मात करून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र सामाजिक कार्यक्रम व सांस्कृतिक उपक्रम राबविताना स्वतंत्र जागा नसल्याने कायमच समस्या निर्माण होत होती. विवाहसोहळे, सभा, मेळावे यासाठी जागा शोधावी लागत होती. या गरजेला ओळखून आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी पुढाकार घेत ३५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला. त्यातून सांस्कृतिक हॉलचे बांधकाम सुरू झाले असून लवकरच हा हॉल समाजाच्या उपयोगासाठी उपलब्ध होणार आहे. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. समाजाच्या शैक्षणिक प्रगतीसाठी शिष्यवृत्ती योजना, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन वर्ग, महिला सक्षमीकरणासाठी उपक्रम यांसारखे कार्यक्रम या हॉलच्या माध्यमातून घेता येतील. समाज एकत्र आला तर विकासाची दारे आपोआप उघडतात. त्यामुळे सांस्कृतिक हॉलचे महत्व आणखीनच वाढते, असे संजय पाटील यड्रावकर यांनी सांगितले.

यावेळी माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे, रमेश भुजुगडे, दीपक गायकवाड, अक्षय आलासे, सुनील कुरुंदवाडे, जवाहर पाटील, अजित भोसले, रामचंद्र मोहिते, अल्ताफ फकीर, अभियंता गवळी आदी मान्यवर उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगरमध्ये दुकानदाराची ७.५१ लाखांची फसवणूक; दुकानातील कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल.

अनैतिक प्रेम संबंधातून शिवथर येथील विवाहित महिलेचा गळा कापून खून.

गणेश टॉकीज जवळ बुलेट ने ठोकर दिल्याने एका महिलेचा मृत्यू.तर दोघेजण जखमी.