Frontline News Maharashtra

पन्हाळा तालुक्यात महिलांसाठी स्वतंत्र सार्वजनिक स्वच्छतागृहांची मागणी .

No comments :

 पन्हाळा तालुक्यात महिलांसाठी स्वतंत्र सार्वजनिक स्वच्छतागृहांची मागणी .

----------------------

कळे प्रतिनिधी

साईश मोळे

--------------------

पन्हाळा लोकसभा मतदारसंघातील एकूण १११ ग्रामपंचायतींपैकी केवळ १० ग्रामपंचायतींमध्येच महिलांसाठी स्वतंत्र सार्वजनिक स्वच्छतागृहांची सुविधा उपलब्ध असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. ग्रामीण महिलांच्या मूलभूत गरजेकडे होत असलेले हे दुर्लक्ष लक्षात घेऊन आता प्रत्येक ग्रामपंचायतीत स्वतंत्र सार्वजनिक स्वच्छतागृह उभारण्याची मागणी तीव्र होत आहे.


ग्रामपंचायत माजी सदस्या सावित्री अमलप्रिय काळे यांनी यासंदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांना निवेदन सादर केले. ग्रामीण भागातील महिला शेतमजूर, ऊसतोडणी कामगार, तसेच बाजार समित्यांमध्ये खरेदी-विक्रीसाठी जाणाऱ्या महिला यांना अत्यंत गैरसोयीचा सामना करावा लागतो. याशिवाय बसस्थानके, दवाखाने, शाळा, ग्रामपंचायत कार्यालये अशा सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह नसल्याने त्यांची गोपनीयता, सुरक्षितता व आरोग्य धोक्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले.


स्वच्छ भारत अभियान तसेच विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून ग्रामपंचायती व जिल्हा परिषदांनी तत्काळ सर्वेक्षण करून महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह उभारणीचे नियोजन करावे, अशी मागणी काळे यांनी केली आहे. महिलांचे आरोग्य, सुरक्षितता आणि सन्मान जपण्यासाठी या विषयाला प्राधान्याने हाताळले जावे, असेही त्यांनी निवेदनात स्पष्ट केले.


या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते प्रतापसिंह काळे हे देखील उपस्थित होते. त्यांच्या मते, "महिलांच्या सन्मानाचा प्रश्न केवळ सुविधेपुरता मर्यादित नसून, तो सामाजिक न्यायाशी निगडित आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींनी व जिल्हा परिषदांनी या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देणे अत्यावश्यक आहे." हा विषय केवळ सुविधेचा नसून महिलांच्या जीवनमान उन्नतीसाठी महत्त्वाचा ठरत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

कोल्हापूर विभाग.

No comments :

Post a Comment