कारखान्यांनी ऊस दर जाहीर केल्यामुळे ऊस तोडणीस प्रारंभ
कारखान्यांनी ऊस दर जाहीर केल्यामुळे ऊस तोडणीस प्रार
गगनबावडा प्रतिनिधी
सुनिल मोळे
गगनबावडा तालुक्यात यंदा मुसळधार पावसाने हजेरी लावली असून, सततच्या पावसामुळे ऊस पिकावर परिणाम झाला आहे. काही भागात उसाची वाढ मंदावली असली तरी अनेक शेतांमध्ये ऊस पूर्णपणे तयार झाल्यामुळे शेतकऱ्यांनी ऊस तोडणीला सुरुवात केली आहे.
पहाटेच्या वेळी कोयत्यांचा आवाज शेतात घुमू लागला आहे. तोडलेला ऊस ट्रॅक्टर, ट्रॉली, ट्रक आणि बैलगाड्यांमधून कारखान्यांकडे रवाना होत आहे. या ऊस तोडणीच्या हंगामामुळे ग्रामीण भागात पुन्हा एकदा रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. शेकडो मजुरांसाठी हा काळ उपजीविकेचा आधार ठरत आहे.
गेल्या पंधरवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे ऊस तोडणीच्या प्रक्रियेला अडथळा निर्माण झाला असला, तरी शेतकरी आणि कामगारांनी परिस्थितीशी जुळवून घेत ऊस तोडणी सुरू ठेवली आहे. यामुळे पशुपालकांनाही दिलासा मिळाला आहे, कारण उसाच्या वाड्यांमधून मिळणारा ओला चारा जनावरांसाठी उपलब्ध झाला आहे.
या ऊस तोडणीच्या हंगामामुळे शेती आणि पशुपालन या दोन्ही क्षेत्रांना नवसंजीवनी मिळत असून, ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळाली आहे.
---

No comments: