Header Ads

हातकणंगलेत सरकारचा “तेरावा दिवस”! भरपाईत अन्याय — शेतकऱ्यांचा संताप उसळला; झाडाला फास लावण्याचा प्रयत्न!

 🔥 हातकणंगलेत सरकारचा “तेरावा दिवस”!

भरपाईत अन्याय — शेतकऱ्यांचा संताप उसळला; झाडाला फास लावण्याचा प्रयत्न!


प्रतिनिधी – कोल्हापूर / हातकणंगले

रत्नागिरी–नागपूर महामार्गाच्या चौपदरीकरणात चौपट नुकसानभरपाईचा लाभ न मिळाल्याने चोकाक ते उदगावदरम्यानच्या शेतकऱ्यांनी सरकारविरोधात आक्रोश पुकारला आहे. अनेक दिवसांपासून आंदोलने, विनंत्या आणि बैठका करूनही न्याय न मिळाल्याने आज शेतकऱ्यांचा संताप अक्षरशः उसळला — भूमी अभिलेख कार्यालयासमोर संतप्त शेतकऱ्यांनी सरकारचा “तेरावा दिवस” साजरा करत निषेध व्यक्त केला!

दरम्यान, अतिग्रे येथील शेतकरी विजय पाटोळे यांनी निषेधाच्या तीव्र भावनेतून कार्यालयातील झाडाला गळफास लावून घेण्याचा प्रयत्न केला; सुदैवाने उपस्थित कार्यकर्ते व पोलिसांनी योग्य वेळी हस्तक्षेप करत अनर्थ टाळला!

👨‍🌾 शेतकऱ्यांची मुख्य मागणी:

चोकाक ते उदगाव या भागातील शेतकरी आणि व्यावसायिकांना केवळ “दुप्पट” नुकसानभरपाई देण्यात आली आहे, तर इतर भागांतील नागरिकांना “चौपट” रक्कम मिळाली. “आमच्या भागातीलच अन्याय का?” असा जाब शेतकरी सातत्याने विचारत आहेत.

गेल्या महिन्यात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन चौपट भरपाईचा शब्द दिला गेला होता, शेतकऱ्यांनी पेढे वाटून आनंदही व्यक्त केला होता. परंतु आजतागायत कोणताही लेखी आदेश न झाल्याने शेतकऱ्यांचा विश्वास तुटला आणि आंदोलन पुन्हा पेटले!

आठ दिवसांपूर्वी झालेल्या मोजणी बंद आंदोलनात उपजिल्हाधिकारी चौगुले यांनी “चार दिवसात तोडगा” देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, प्रशासनाकडून कोणतीच हालचाल न झाल्याने आणि पुन्हा मोजणी सुरू झाल्याने शेतकरी संतप्त झाले.

आज सकाळी आंदोलनकर्त्यांनी हातकणंगले भूमी अभिलेख कार्यालय गाठले, परंतु बारा वाजेपर्यंत अधिकारी हजर नसल्याने संतापाचा स्फोट झाला! कार्यकर्त्यांनी कार्यालयाला टाळ ठोकले आणि सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

 “सरकार आणि लोकप्रतिनिधी मिळून आमच्यावर अन्याय करत आहेत; शेतकऱ्यांची थट्टा थांबवा!” अशी जोरदार मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

यावेळी विक्रम पाटील, सुरेश खोत, दीपक वाडकर, डॉ. अभिजीत इंगवले, अमित पाटील, किरण जामदार, विजय पाटोळे, प्रतीक मुसळे, शहाजी हेरले, अभिजीत पाटील, आनंदा पाटील, भिकाजी पाटील, अशोक सूर्यवंशी, विद्याधर दुग्गे, सारंग पाटील यांच्यासह शेकडो शेतकरी आणि व्यापारी उपस्थित होते.

📸 “सरकारचा तेरावा दिवस” म्हणत आंदोलनकर्त्यांनी केलेल्या विधीमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे

No comments:

Powered by Blogger.