महात्मा ते महात्मा समता पदयात्रिक मारुती कांबळे यांचे निधन
महात्मा ते महात्मा समता पदयात्रिक मारुती कांबळे यांचे निधन
----------------------------------------कळे प्रतिनिधी,
सुनिल मोळे
----------------------------
कळे:- कोल्हापूर जिल्ह्यातील मरळी ( ता. पन्हाळा ) गावचे सुपुत्र, ‘महात्मा ते महात्मा समता पदयात्रा’चे निष्ठावान पदयात्रिक आणि विठ्ठलभक्त मारुती कांबळे (वय ८४) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने समाजकार्य, संतपरंपरा व समतेच्या विचारांसाठी झटणारा एक खंदा कार्यकर्ता हरपला आहे.
मारुती कांबळे हे पंढरपूर आषाढी वारीचे निस्सीम भक्त होते. त्यांनी आपल्या गावात संत चोखामेळा यांची मूर्ती स्थापित करून मठाची स्थापना केली. दररोज हरिपाठ, ज्ञानेश्वरी वाचन आणि धार्मिक ग्रंथांचे पारायण त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग होता. काही काळ त्यांनी आळंदीतही वास्तव केले होते.
समतेची प्रतीकात्मक पदयात्रा – एक ऐतिहासिक सहभाग
‘महात्मा ते महात्मा समता कावड पदयात्रा’ ही महात्मा फुले यांच्या पुण्यातील ऐतिहासिक वाड्यातून सुरू होऊन, सेवाग्राम (वर्धा) येथील महात्मा गांधी आश्रमापर्यंत गेलेली ऐतिहासिक यात्रा होती. ही यात्रा ९०० किमी अंतर पार करत नऊ जिल्ह्यांमधून गेली. समतेचा संदेश देणाऱ्या या पदयात्रेमध्ये मारुती कांबळे यांनी पूर्णवेळ सहभाग घेतला. समतेची कावड वाहून, त्यांनी महात्मा फुले यांच्या वाड्यातील विहिरीचे पाणी आणि ‘चवदार तळ्याचे’ पाणी सेवाग्रामपर्यंत पोहोचवले. ही यात्रा तब्बल दीड ते दोन महिने चालली होती.
त्यांचे मावसभाऊ आणि महाराष्ट्र प्रदेश सर्वोदय मंडळाचे माजी अध्यक्ष आबा कांबळे यांनीही समाजसेवेच्या कार्यात मोलाचे योगदान दिले आहे.
त्यांच्या पश्चात तीन मुली, एक मुलगा, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने गावात तसेच कळे विभागात आणि समविचारी सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली आहे.
कोल्हापूर विभाग.
No comments :
Post a Comment