अंबप येथे विषबाधेने २० मेंढ्यांचा मृत्यू; ४० मेंढ्या वाचवण्यात पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे यश मेंढपाळाचे सुमारे चार लाखांचे नुकसान
अंबप येथे विषबाधेने २० मेंढ्यांचा मृत्यू; ४० मेंढ्या वाचवण्यात पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे यश
मेंढपाळाचे सुमारे चार लाखांचे नुकसान.
अंबप (ता. हातकणंगले) : किशोर जासूद
----------------------------------
अंबप गावच्या पश्चिमेकडील इंडस्ट्रियल पार्कच्या माळावर चरत असलेल्या मेंढ्यांना विषबाधा झाल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. या घटनेत तब्बल २० मेंढ्यांचा मृत्यू झाला असून, ४० मेंढ्या तत्काळ उपचार करून वाचवण्यात पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना यश आले आहे.
मेंढपाळ सतीश हिरवे यांच्या मेंढ्या दोन दिवसांपासून या माळावर चरत होत्या. बुधवारी दिवसभर चरल्यानंतर गुरुवारी सकाळी मेंढ्यांचे पोट फुगून अचानक मृत्यू होऊ लागले. काही तासांतच मृत मेंढ्यांची संख्या वीसवर गेली.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना कळवले. अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन उर्वरित मेंढ्यांना उपचार केले. दुपारी सरपंच दीप्ती माने, उपसरपंच असिफ मुल्ला, पोलीस पाटील पंढरीनाथ गायकवाड व तलाठी उमेश माळी यांनी घटनास्थळाची पाहणी करून परिस्थितीची माहिती घेतली. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत मेंढ्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत.
🔸 घटनेची चौकट:
सकाळी मेंढ्यांचा मृत्यू सुरू होताच काहींनी या मृत मेंढ्या मटन विक्रीसाठी विकल्याची माहिती मिळाली. यानंतर वडगाव पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संबंधितांना ताब्यात घेऊन गुन्हे नोंदवले आहेत.

No comments: